Manoj Jarange : नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात नगर येथील मोडी लिपी तज्ज्ञ डाॅ. संताेष यादव यांनी जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी येथील नोंद शाेधली आहे. आता जरांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन
मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर लढा उभारला आहे. त्यातून सरकारने नेमलेल्या शिंदे समिती मार्फत कुणबी नाेंदी शाेधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातून ५४ लाख नाेंदी शाेधण्याला समितीला यश आले आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद अखेर सापडली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून फेरतपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे देखील वाचा : ग्रंथ प्रदर्शनाला पारनेरकरांचा उदंड प्रतिसाद
जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी शिरूर येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अल्पेश पाटील यांच्याकडे नोंद तपासण्याची मागणी केली होती. रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही दुपारी बारापासून पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी आणि नगर येथील इतिहास संशोधक तथा अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांनी याकामी मोलाची भूमिका बजावली. याशिवाय उपअधीक्षक अल्पेश पाटील, रावसाहेब लक्ष्मण जरांगे (मनोज जरांगे यांचे वडील), डॉ. घोडके आदी उपस्थित होते. १८८०च्या जनगणनेनुसार मातोरी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्वजांची नोंद शासन दरबारी आढळली असल्यामुळे जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यात ५४ गावे असून, त्यापैकी ३४ गावांच्या नोंदी आतापर्यंत शोधल्या आहेत. मातोरीसह बोरगाव चकला, तिंतरवणी आणि तरडगव्हाण या चार गावांच्या फेरतपासणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडल्या आहेत.