Maratha : नगर : मराठा (Maratha) समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग नव्याने इम्पिरिकल डाटा संकलित करणार आहे. जिल्ह्यात साधारणपणे साडेनऊ लाख घरे आहे. त्यासाठी प्रगणकांच्या मार्फत घरोघरी जाऊन मराठा सर्वेक्षण (Maratha Survey) केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
हे देखील वाचा : डिजेने तिघांना चिरडले; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
सर्वेक्षणाबाबत जिल्हा प्रशासन मिशन मोडवर कार्यरत झाले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नुकत्याच दोन बैठका घेतल्या. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, मराठा सर्वेक्षण अभियानाचे जिल्हास्तरीय सहायक नोडल अधिकारी शाहूराज मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका
जिल्हाधिकारी म्हणाले, ”गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या मोबाईल ॲपद्वारे प्रगणक ही माहिती जमा करणार आहेत. जमा केलेली माहिती थेट ऑनलाइन पद्धतीने आयोगाकडे संकलित होणार आहे. जिल्ह्यात साधारणपणे साडेनऊ लाख घरे आहेत. मोबाईल ॲप मिळाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यासाठी निवडलेल्या मास्टर ट्रेनर यांना पुणे येथील यशदामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्याचे हे मास्टर ट्रेनर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय नोडल अधिकारी असलेल्या तहसीलदार, सहायक नोडल अधिकारी तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि त्यांचे सहायक अधिकारी यांना सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षण देणार आहेत. त्यांनतर तालुका पातळीवर तालुकास्तरीय ट्रेनर प्रगणकांना प्रशिक्षित करतील. त्यानंतर घरोघरी जाऊन नियुक्त करण्यात आलेले प्रगणक आयोगाने तयार केलेल्या दीडशे प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित करतील. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता यासाठी जवळपास २० हजार कर्मचारी यासाठी तैनात केले जातील. एका प्रगणकासाठी १०० घरे नेमून दिली जातील. प्रगणकाच्या मदतीसाठी पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी राहणार आहेत. जिल्ह्याच्या सर्व सरकारी विभागातील अधिकारी कर्मचारी यासाठी नियुक्त राहणार आहेत. सर्वेक्षणा दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला जाईल.”