Maratha Reservation : नगर जिल्ह्यात कुणबीच्या ५७ हजार नाेंदी; लाखाेंच्या घरात नाेंदी सापडण्याचा अंदाज

नगर जिल्ह्यात कुणबीच्या (Kunbi) नाेंदी शाेधण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम सुरू आहे.

0
240

नगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभर चांगलाच तापला आहे. नगर जिल्ह्यात कुणबीच्या (Kunbi) नाेंदी शाेधण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम सुरू आहे. यात आजमितीला ५६ हजार ६८८ प्रमाणपत्रांच्या नोंदी जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) हाती आल्या आहेत. नगर जिल्ह्यात लाखोंच्या घरात कुणबीच्या नोंदी सापडण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. सर्व शासकीय विभागात याबाबतची माहिती जमा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत हा आकडा अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे. जिल्ह्यात आढळणार्‍या कुणबीच्या नोंदीची माहिती संकलित झाल्यावर ती राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कुणबी नाेंदीची शाेध मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला आहे. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

नक्की पहा : ग्रामपंचायत निवडणूक : आम्हीच नंबर वन; राजकीय पक्षांचे दावे, प्रतिदावे

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसात प्राथमिक शाळांमधील ११ लाख १४ हजार ९५८ शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या आहे. यात ४ हजार ११ जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. तर जात प्रमाणपत्र वैधता विभागाने ५२ हजार ६७७ जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ५६ हजार ६८८ जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह महसूल, पोलीस यंत्रणा, खरेदी दस्तावेज, नगर शहरातील वस्तूसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या रेकॉर्ड यांचा शोध घेण्यात येत असून सर्व शासकीय विभाग कुणबी नोंदी शोधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहे.