Murder : नगर : राहुरी तालुक्यातील वकील (lawyer) दाम्पत्याचे खंडणीसाठी अपहरण करून खून (Murder) करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने चार जणांना अटक केली आहे. किरण नानाभाऊ दुशिंग (वय ३२, रा. उंबरे, ता. राहुरी), सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजित महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रेय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
हे देखील वाचा : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगेचा इशारा
तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपी ताब्यात (Murder)
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दाम्पत्य राजाराम जयवंत आढाव (वय ५२) व मनीषा राजाराम आढाव (वय ४२) हे गुरुवार (ता. २५)पासून बेपत्ता असल्याची फिर्याद लता शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वकील दाम्पत्याच्या कारचा शोध घेतला असता ती कार राहुरी न्यायालयाच्या परिसरात आढळून आली. ही कार आणणारे व्यक्ती दुसऱ्या कारमधून आल्याचे समोर आले. परिसरातील व्यक्ती, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर हा गुन्हा किरण दुशिंगने केल्याचे पथकाच्या लक्षात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार दुशिंग याची असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी किरण दुशिंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे व बबन सुनील मोरे यांच्या साथीने केल्याचे सांगितले.
अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान
प्लॅस्टिक पिशवीने आवळून खून (Murder)
आरोपींनी वकील दाम्पत्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांनी ही खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी दाम्पत्याचा त्यांच्या घरातच पाच ते सहा तास छळ केला. त्यानंतर वकील दाम्पत्याला त्यांच्याच कारमध्ये टाकून मानोरी गावाच्या बाहेर नेण्यात आले. तेथे या दाम्पत्याच्या तोंडावर प्लॅस्टिक पिशवीने आवळून त्यांचा खून करण्यात आला. दोन्ही मृतदेहांना दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत टाकून दिले. दाम्पत्याची कार राहुरी न्यायालयात आणून लावण्यात आली, असे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार पथकाने उंबरे येथील विहिरीत शोध घेतला असता दाम्पत्याचे मृतदेह तेथे आढळून आले.
पथकाने किरण दुशिंगचे साथीदार सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे यांनाही ताब्यात घेतले. किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी व खंडणी सारखे १२ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. तर सागर खांदे वर दोन गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपींवर राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने चारही आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.