Murder | नगर : प्रेमासाठी चक्क प्रियकर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या (Murder) घडविण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) मृताची पत्नी, तिचा प्रियकर व त्याचे पाच साथीदार अशा सात जणांना अटक केली आहे. आरती योगेश शेळके (वय २६), रोहित साहेबराव लाटे (वय २३, दोघे रा. कोथूळ, ता. श्रीगोंदा), शोएब महमंद बादशाह (वय २२, रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतीश गाडे (वय १९, रा. सोलापूर बाजार, कॅम्प, पुणे), आयुष शंभू सिंह (वय १८), पृथ्वीराज अनिल साळवे (वय १९) व अनिश सुरेंद्र धडे (वय १९) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
असा केला खून (Murder)
श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे ३० जानेवारीला (मंगळवारी) योगेश सुभाष शेळके हा विवाहीत युवक घरात झोपलेला. त्यावेळी त्याच्या घरात अचानक चार व्यक्ती शिरले. त्यांनी योगेशच्या गळ्यावर, हातावर व उजव्या पायावर कोयत्याने वार केले. यात योगेश गंभीर जखमी झाला. योगेशची पत्नी आरतीच्या गळ्याला कोयता लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी हल्लेखोरांनी दिली. असे आरती शेळकेने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यामुळे जखमी योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी खून व दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला.
अवश्य वाचा : ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची घोषणा ; दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत
पोलीस पथकाने काढला माग (Murder)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दोन पथके नियुक्त केली होती. या पथकांनी कोथूळ येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच परिसरातील व्यक्तींकडून माहिती घेतली. तपास करत असताना पथकाला फिर्यादी आरती शेळकेचा संशय आला. मात्र, पथकाजवळ पुरावा नसल्याने पथकाने इतरत्र तांत्रिक बाबींमधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यात मयत योगेश शेळकेचा भाचा शुभम लगड यांच्या मोबाईलवर घटना घडली त्या दिवशी सकाळी रोहित लाटेचा फोन आल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने रोहित लाटे याला पुण्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
रोहित लाटेने पथकाला सांगितले की, आरती व त्याचे प्रेम संबंध होते. त्यावरून योगेश शेळकेला या दोघांच्या अनैतिक संबंधावर संशय होता. त्यामुळे तो आरतीला दारू पिऊन मारहाण करत होता. त्यानुसार रोहितने १५ दिवसांपूर्वी नियोजन करून अनिश धाडे याच्या मध्यस्थीने योगेश शेळकेच्या खुनाची दीड लाख रुपयांची सुपारी पृथ्वीराज साळवे, विराज गाडे, शोएब बादशाह व आयुष सिंह यांना दिली, असे त्याने सांगितले. त्यानुसार पथकाने सातही आरोपींना अटक केली. पथकाने आरोपींना पुढील तपासासाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हे पहा : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा
दिनेश आहेर यांना ३५ हजारांचे बक्षीस
राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचा खून व कोथूळ येथील योगेश शेळके खून प्रकरणाचा वेगवान तपास करत सर्व आरोपी जेरबंद केल्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा विशेष सत्कार केला. यात त्यांनी ३५ हजार रुपयांचे बक्षीस पोलीस निरीक्षक आहेर यांना दिले.