Murder | संगमनेर (Sangamner) तालुक्यातील चिंचेवाडी येथील वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत जेरबंद केले. या आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मिळविण्यासाठी वृद्धाचा खून (Murder) केल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे. नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) व सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : एमपीएससीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर; विनायक पाटील राज्यात प्रथम
गुन्हा दाखल (Murder)
चिंचेवाडी येथील देवराम मुक्ता खेमनर हे मलिबाबा मंदिरात झोपले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी बाळू देवराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आला.
अवश्य वाचा : देशात मोदी व राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरोपी असे झाले जेरबंद (Murder)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासासाठी पथके तैनात केली. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली. मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर व मिळालेल्या माहितीच्या आधारावर नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे यांचा शोध घेतला. दोन्ही संशयित आरोपी चिंचेवाडीच्या डोंगरात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चिंचेवाडीच्या डोंगरात शोध घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. झोपलेल्या वृद्ध देवराम खेमनर यांच्या खिशातील पैसे दारू पिण्यासाठी काढून घेतले. त्यानंतर त्यांचा खून केल्याचे आरोपींनी पथकाला सांगितले. जेरबंद आरोपींपैकी नामदेव सोन्नर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तो एका गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.