Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर;आजपासून विठ्ठलाचे २४ तास दर्शन  

येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा भरणार आहे. या यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे.

0

नगर : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात (Pandharpur Mandir) २४ तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. भक्तांसाठी आता विठ्ठल मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे.

नक्की पहा : मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु

आज (ता. १६) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास देवाच्या पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येणार आहे. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो, यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. देवाचा पलंग काढल्यानंतर देवाची रात्रीची विश्रांती बंद होते.

हेही पहा :  आयसीसीची मोठी घोषणा; हॉल ऑफ फेममध्ये ‘या’ भारतीय क्रिकेटरचा समावेश

येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा भरणार आहे. या यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे. कार्तिकी यात्रा संपल्यानंतर १ डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होतील. २४ तास दर्शनाला उभा असल्याने देवाला शिणवटा जाणवू नये, यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान, नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच कारणांसाठी दर्शन बंद राहणार आहे. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असेल.

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी  विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची पाहणी केली आहे.  यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही याबद्दल  सूचना प्रशासनाला दिल्यात.