नगर तालुका : राहुरी येथे पुणे पोलिसांच्या (Police) हातून पाच वर्षांपूर्वी पसार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केला. या आरोपी (accused) समवेत त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्याही पथकाने आवळल्या आहेत. या आरोपींकडून गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व चोरीची मोटार सायकल असा तीन लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही पथकाने हस्तगत केला आहे. तुकाराम बन्सी वारे (वय २१, रा. माळवाडी पळशी ता. पारनेर), रोशन संपत रोकडे (वय २३, रा. वडगाव सावताळ ता. पारनेर), प्रवीण लक्ष्मण दुधावडे (वय २१, रा. अकलापूर घारगाव ता. संगमनेर), दीपक मधुकर शिंदे (वय २०, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
हे देखील वाचा : मराठा आरक्षणासाठी अकोले तालुक्यात कडकडीत बंद
जिल्ह्यातील फरार आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फरार आरोपींविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. फरार आरोपी शोधून त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पथकाने पुणे पोलिसांच्या हातून राहुरी येथून फरार आरोपी तुकाराम वारे याला जेरबंद करण्यासाठी माहिती काढण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा : अर्धवट आरक्षण नकाे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट संदेश
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, तुकाराम वारे हा त्याच्या साथीदारांसह गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी नगर-कल्याण रस्त्यावरील टाकळी ढोकेश्वर शिवारातील पारनेर फाटा येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्यांना एक व्यक्ती मोटार सायकलवर बसलेला व त्यांच्या बाजूला तीन व्यक्ती बोलताना दिसले. खात्री होताच पथकाने संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. आरोपींपैकी तुकाराम वारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्या विरुध्द नगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी आदी १० गुन्हे दाखल आहेत.