PRAHAR : नेवासा : नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी येत्या आठ दिवसात वितरीत करा, अन्यथा प्रहार (PRAHAR) जनशक्ती पक्षाच्या वतीने मुक्काम व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे (PRAHAR JANSHAKTI PARTY) जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
हे देखील वाचा : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार
उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पोटे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम लागू केलेला आहे. दिव्यांगांना समाजात सहजतेने जगता यावे, यासाठी शासनाने विविध योजना लागू केलेल्या आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच संजय गांधी निराधार योजना यादी विभाग आजही दिव्यांगंच्या बाबत उदासीन असल्याने दिव्यांगांच्या योजना व त्यासाठी असलेल्या राखीव निधी वाटपाबाबत दिरंगाई होऊन प्रशासनाकडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना त्यापासून वंचित राहावे लागत होते. ही बाब शासनाचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर पावले उचलून दिव्यांग अधिनियम २०१६ हा कायदा नव्याने पारित केला आहे.
नक्की वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी दिव्यांगांचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवून दिव्यांगाना वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची माहिती विहित नमुन्यात अद्यावत भरून ठेवण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच पंचायत राज संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवून तो वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
तसेच सदरील निधी हा दिव्यांगाना रोख स्वरूपात देण्यात यावा, वस्तू स्वरूपात दिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दिव्यांगांना गरज नसलेली वस्तू वारंवार वाटप होताना आढळून आलेले आहे. त्यामुळे या निधीचा अपव्यय होत आहे.
तरी अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसात वितरित करावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यालयांचा ताबा घेवून दिव्यांगांसह मुक्काम व ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे निवेदनात प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी म्हटले आहे.