Punishment : नगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने (Court) दोषी ठरवत २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. प्रकाश बाबुराव कडूसकर (वय ४१, रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राऊत यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?
अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
मार्च २०२२ ते १३ जुलै २०२२ या कालावधीत प्रकाश कडूसकरने पीडितेला एका तळ्याच्या काठी खाऊ देण्याचे कारण सांगत नेले. तिथे तिच्यावर सक्तीने अत्याचार केला. झालेला प्रकार घरच्यांना सांगितला तर वडिलांचा काटा काढण्याची व पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार व धमकावण्याचे गुन्हे दाखल केले.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले
घटनेचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी आदींची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी १५ वर्षे १० महिन्यांची होती, अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पद्धतीने हा गुन्हा केला आहे. त्यामुळे आरोपीला निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागतील. त्यामुळे लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अल्पवयीन मुलगी ही आरोपी विरुद्ध काही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच पाच हजार रुपयांचा दंड तर दंड न भरल्यास चार महिने साधी कैद, धमकावण्याच्या गुन्ह्यात तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच तीन हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.