Ram Navami : श्रीरामपूर : श्रीरामपुरचे (Srirampur) आराध्य दैवत व राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीरामपूरची ९५ वी प्रभू श्रीराम नवमी (Ram Navami) यात्रा १७ एप्रिलला सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाची (Festival) श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.
हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
फटाक्यांची आतषबाजी व शोभेचे दारूकाम (Ram Navami)
या यात्रेकरिता राज्यातील विविध भागातून छोटे-मोठे व्यवसायिक, रहाट पाळणे त्याचबरोबर भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यादृष्टीने यात्रोत्सव मोठ्या आनंदाने व शांततेत पार पडावा, याकरिता श्रीराम नवमी यात्रा उत्सव कमिटी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बुधवारी (ता.१७) दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव तसेच भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सायंकाळी ६ वाजता रथातून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. तसेच वॉर्ड क्रमांक सातमधील पाटाजवळ फटाक्यांची आतषबाजी व शोभेचे दारूकाम केले जाते. मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार
हगाम्यासह विविध उपक्रमांचे आयोजन (Ram Navami)
यात्रा उत्सव निमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिर येथे गुरूवारी (ता.१८) सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिकांचा यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी ७ वाजता श्री शनि देवाचा छबीना काढण्यात येणार आहे. रथ ओढण्याचा मान गोंधवणी येथील वतनदार असलेले रामलाल बाळी गायकवाड यांना वंशपरंपरेने दिलेला आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.१९) दुपारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्लांचा कुस्त्यांचा फड हगामा दरवर्षीप्रमाणे होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील अनेक नामांकित पैलवान येणार आहेत. या हगामासाठी विविध भागातून सुमारे ४०० पेक्षा अधिक मल्ल येत असतात. त्यांच्या लहान मोठ्या कुस्त्या लावल्या जातात आणि बिदागी दिली जाते. तसेच आशिष बोरावके यांच्यावतीने त्यांचे वडील (कै.) अण्णासाहेब बोरावके यांच्या स्मरणार्थ व श्रीरामपूरचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र बाळाराम महाराज उपाध्ये यांच्या स्मरणार्थ उपाध्ये परिवारातर्फे आणि श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वतीने मानाच्या कुस्तीच्या पैलवानांना सुवर्णपदक दिले जाते.
श्रीरामपूर शहरात गेल्या ९४ वर्षांपासून सुरू असलेल्या या श्रीराम नवमी यात्रा उत्सवासाठी शहरातील व परिसरातील व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, विविध विभागाचे अधिकारी, सार्वजनिक संस्था, लोकप्रतिनिधी, श्रीराम मंदिर ट्रस्ट व शहरवासीयांचे मोठे योगदान लाभत असल्याचे श्रीराम यात्रा उत्सव कमिटीने म्हटले आहे.