Santosh Khade : नगर : नेवासा (Newasa) तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदी पात्रात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस (Police) उपअधीक्षक संतोष खाडे (Santosh Khade) यांना मिळाली. त्यांनी वेशांतर करत विशेष पोलीस पथकासह नदी पात्रात जाऊन वाळू तस्करांवर (Sand Smuggling) कारवाई केली. या कारवाईत ७५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
वेशांतर करत पथकासह नदी पात्रात धाड
पोलीस उपअधीक्षक खाडे यांना काल (ता. २५) वाळू तस्करीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वेशांतर करत पथकासह गोदावरी नदी पात्रात धाड टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच सहा आरोपी पसार झाले. प्रविण नामदेव म्हस्के (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा), जेसीबी चालक-मालक विशाल दत्तात्रय ठोंबरे (वय २३, रा. गोधेगाव, ता. नेवासा), वाळू भरून देणारा अभिषेक भिमराज जाधव (वय २३, रा. गोधेगाव, ता. नेवासा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार (दोघे रा. गोधेगाव, ता. नेवासा), कृष्णा पूनम सिंग परदेशी (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा), कल्याण उन्हाळे (रा. प्रवरासंगम, ता. नेवासा), काका पठारे (रा. धामोरी, ता. नेवासा) व एका ट्रॅक्टरचा चालक-मालक असे सहा जण पसार आहेत.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
७५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Santosh Khade)
पथकाने जेरबंद आरोपींकडून एक जेसीबी, पाच वाळूने भरलेल्या ट्रॉली व एक ट्रॅक्टर असे सहा ट्रॅक्टर हे पाच ब्रास वाळूसह मिळून आले. हा ७५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. पुढील तपासासाठी पथकाने जेरबंद आरोपींना नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.