ST Bus : अकोले : उच्च शिक्षणासाठी (Higher Education) आढळा खोऱ्यातील विद्यार्थी (Students) अकोले व संगमनेर येथे जातात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) बसफेऱ्या अजूनही कमीच असल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. वेळप्रसंगी मिळेल त्या साधनाने घराची वाट धरावी लागत असल्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
हे देखील वाचा : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही
आढळा पट्ट्यातील केळी सांगवी, समशेरपूर, टाहाकारी, सावरगाव पाट, देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे आदी गावांतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अकोले व संगमनेर येथे जातात. तसेच नियमित प्रवासी देखील मोठ्या संख्येने जातात. मात्र, बसच्या फेऱ्या मोजक्याच असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी घराबाहेर पडल्यानंतर येण्यासाठी रात्रच होते. वेळेवर बस मिळत नसल्याने अनेकदा मिळेल त्या साधनाने घरी यावे लागत आहे. यात विद्यार्थिनींची मोठी कसरत होत आहे.
नक्की वाचा : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे
आगार व्यवस्थापकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 18 ते 20 डिसेंबर, 2023 पर्यंत केलेल्या विद्यार्थी पास सर्व्हेच्या अहवालानुसार प्रतिकिलोमीटर कमी उत्पन्न असणाऱ्या बसच्या फेऱ्या बंद करुन त्याऐवजी जास्त उत्पन्न देणाऱ्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. परीक्षेची वेळ असल्यावर तर विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी काय करावे हेच सुचत नाही. परिणामी शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे अकोले व संगमनेर आगाराने विद्यार्थी व प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बसच्या पूर्वीप्रमाणे फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.