३४८ विद्यार्थांसाठी अवघे सात शिक्षक; विज्ञान विषयाचा शिक्षकच नाही
Student : अकोले : तालुक्यातील कळस जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School) मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. कारण ३४८ विद्यार्थांचे (Student) भविष्य घडवण्यासाठी अवघे ७ शिक्षक काम करत आहे. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या शाळेत एकूण बारा तुकड्या आहे आणि सदर व्यवस्थेसाठी नियमानुसार १३ शिक्षकांची (Teacher) आवश्यकता आहे. परंतु अवघ्या सात शिक्षकांच्या भरवशावर शाळेचा अर्धवट दिनक्रम चालू आहे. त्याच सात शिक्षकांपैकी दोन शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्याने राहिलेले पाच शिक्षक आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय कसा देणार? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
हे देखील वाचा : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
कळस शाळेची नेत्रदीपक इमारत, संगणक कक्ष व शैक्षणिक आधुनिकीकरण असे आहे, की एखाद्या खासगी शाळेला देखील लाजवेल. परंतु अशा सेमी इंग्रजी शाळेला गेल्या वर्षापासून विज्ञान विषयाचा शिक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ च्या नियमानुसार मंजूर शिक्षकांच्या १० टक्केहून जास्त जागा रिक्त ठेवता येत नाही. परंतु याउलट करामत कळस शाळेच्या बाबतीत घडली आहे. पाच शिक्षकांची जागाच अनेक दिवसांपासून रिक्त असल्याचे दिसून येते.
नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून नासा, इस्रो तसेच विविध क्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करतात. परंतु ज्या विषयातून या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा अशा विषयाचे शिक्षण देण्यासाठी वर्षापासून शिक्षक नाही ही खेदाची बाब आहे. अशा कारणाने जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओघ कमी झाला आहे.
- विनय वाकचौरे, पालक, कळस
या सावळ्या गोंधळाच्या विरोधात वेळोवेळी संबंधित अधिकारी व प्रशासनास पत्र व्यवहार केला तरी देखील याची दखल न घेतल्यामुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासाठी सोसायटीचे अध्यक्ष विनय वाकचौरे यांच्या पुढाकाराने ग्रामसभेचा ठराव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त व संबंधित विभागाला थेट ठरावासह पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, उपसरपंच केतन वाकचौरे, सोसायटीचे अध्यक्ष विनय वाकचौरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, शांताराम वाकचौरे, नामदेव निसाळ, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे आदी उपस्थित होते.