Burglary : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या घरी झालेल्या 47 लाख रुपयांच्या घरफोडीचा (Burglary) छडा लावण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे.

0
Burglary : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड
Burglary : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड

Burglary | श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या घरी झालेल्या 47 लाख रुपयांच्या घरफोडीचा (Burglary) छडा लावण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. डॉक्टरांच्या घरी पूर्वी कामाला असणाऱ्या मोलकरणीने तिचा भाऊ व अन्य नातेवाईकांच्या मदतीने ही धाडसी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. जाबीर रशिद शेख (वय 32, रा. रेट्टी ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), हिना राजू सय्यद (वय 38, रा. घास गल्ली, ता. श्रीरामपूर) अशी जेरबंद आरोपी असलेल्या भाऊ-बहिणीची नावे आहेत.

हे देखील वाचा : नगरच्या माेडी लिपी तज्ज्ञांनी शाेधली मनाेज जरांगेंची कुणबी नाेंद

30 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या घरी चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधुन घराच्या गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापून त्यातून घरात प्रवेश केला. त्यांनतर डॉक्टर यांचे हातपाय बेडशीटने बांधून त्यांचा मुलगा डॉ.चिन्मय याच्या खोलीच्या दरवाज्याची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर डॉक्टरांचे लोखंडी कपाट हत्याराने फोडून कपाटात ठेवलेले 40 चाळीस लाख रुपये रोख व 7 सात लाख किंमतीचा सोन्याचा हार (14 तोळे वजनाचा) असा एकूण 47 सत्तेचाळीस लाख रुपयांचा  मुद्देमाल लंपास केला होता. यावरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन तसेच गुप्तबातमीदारांमार्फत माहिती घेऊन गुन्ह्यातील मुद्देमालाचा व आरोपींचा शोध घेतला. 

नक्की वाचा : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार

मिळालेल्या माहितीनुसार जाबीर शेख याने हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला एका लग्न समारंभातून ताब्यात घेतले.  घडलेल्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याची बहीण हिना सय्यद, इतर दोन साथीदार गौसखाँ हनिफखाँ पठाण, इरफान इब्राहिम पठाण (दोन्ही रा. गराडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 12 लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली 1 लाख 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी आरोपी जाबीर शेख यांच्याकडून हस्तगत करण्यात आली.  51 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 66 हजार  रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेडल मणी, 14 हजार रुपये किंमतीचे चांदीच्या पायातील पट्टया, असे 1 लाख 76 हजार रुपयांचे दागिने हिना राजू सय्यद हिच्या कडून हस्तगत करण्यात आले. तसेच 3 लाख 96 हजार रुपये रोख रक्कमही तिच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केले, असा एकूण 19 लाख 3 हजार  रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याशिवाय आरोपी जाबीर शेख याने  2 लाख 75 हजार रुपयांचे वेगवेगळ्या बँकेचे लोन निल केल्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपी जाबीर शेख, हिना सय्यद या बहीण भावांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here