Nagar Rising Marathon | नगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची हाफ मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन (Nagar Rising Marathon) स्पर्धा यंदा रविवारी (ता. ४) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची टीम व कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘काव्यांजली – सखी सावली’तील कलाकार आकर्षणाचा केंद्र ठरतील, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व ‘सोहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा यांनी दिली.
हे देखील वाचा : कर्जत तालुका ओबीसी समाजाचा तहसीलवर मोर्चा
असे आहे नियोजन (Nagar Rising Marathon)
ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन प्रकारांत होईल. स्पर्धेची सुरुवात अहमदनगर क्लब जवळील हत्तीच्या पुतळ्यापासून होईल. २१ किलोमीटरची मॅरेथॉन रविवारी (ता. ४) सकाळी ६ वाजता, १० किलोमीटरची सकाळी ६.३० वाजता तर ४ किलोमीटरची मॅरेथॉन ७.३० वाजता सुरू होईल. मॅरेथॉन निमित्त रविवारी (ता. ४) पहाटे ५ वाजेपासूनच विविध कार्यक्रमांचे अहमदनगर क्लबमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा : अंतरिम बजेट म्हणजे शेतकरी, गरिबांची फसवणूक; विराेधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका
शनिवारी किट मिळणार (Nagar Rising Marathon)
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांची किट शनिवारी (ता. ३) दुपारी १ ते सायंकाळी ८ या वेळेत अहमदनगर क्लब येथे मिळणार आहे. या किटमध्ये टी शर्ट, चेस नंबर व भेट वस्तूंचा समावेश आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये शिवरायांचा छावा चित्रपटातील कलाकार समीर धर्माधिकारी, रवी काळे, तृप्ती तोरडमल, भुषण पाटील, ‘काव्यांजली – सखी सावली’ या मालिकेतील कलाकार, झुंबा डान्सर स्वप्नाली जांबे आदींसह नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, एस.एस. मोबाईल शॉपी, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स, रेव्होल्ट, बी.यू. भंडारी व आयडीएफसी फस्ट बँक हे सह प्रायोजक आहेत.