प्रल्हाद एडके
विश्वचषक (world cup) 2023 चा थरार आता शिगेला पोहचला आहे. या विश्वचषकात अनेक अटीतटीचे सामने प्रेक्षकांनी अनुभवले. तर दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघानी दिग्गज संघांना धूळ चारली. या विश्वचषकात भारताचा वारू सुसाट सुटला आहे. भारताने (India) आत्तापर्यंतच्या सामन्यात सर्वच आघाड्यांवर बाजी मारत दणदणीत विजय मिळवले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझिलॅंड या तगड्या संघाबरोरबर तसेच बांग्लादेश व अफगाणिस्तान यांनाही सहज पराभूत केले. त्यानंतर गतविजेत्या इंग्लंडलाही (Ind-Eng) तब्बल १०० धावांनी पराभवाची धूळ चारली.
या विजयानंतर भारत गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. भारताच्या विजयामध्ये सर्वच खेळाडू चमकत आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांचा अनुभव संघाला लाभदायक ठरत आहे. रोहित शर्मा आक्रमक खेळी करून धावसंख्या उभारणीची मजबूत पायाभरणी करून देत आहे. त्याला शुभमन गिल तोलामोलाची साथ देत आहे. विराटने आपला अनुभव पणाला लावत अनेक सामन्यात दमदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव, के एल राहुल, रवींद्र जडेजा यांचेही मोक्याच्या क्षणी योगदान मिळत आहे.
हे देखील वाचा : नगर महापालिका करणार पान टपऱ्यांवर कारवाई
या विश्वचषकात भारताची गोलंदाजी प्रचंड भेदक वाटत आहे. बुमराह, शामी, सिराज व कुलदीप यादव हे विरोधी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. संघातील प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये असण्याची कदाचित भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघाचा वारू रोखणे विरोधी संघांसाठी कठीण जाणार आहे. सुरुवातीच्या पडझडीनंतरही अनेकदा मधल्या फळीने भारताचा बचाव भक्कम दाखवला आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार बनला आहे. भारतीय संघाने अनेकदा दिलेल्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे. तर गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध २२९ धावांचाही भक्कमपणे बचाव करत दोन्हीही आघाड्यावर सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे संभाव्य विजेता म्हणून गणला जाणारा भारत आता विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे. भारताला रोखणे आता केवळ अशक्य बनले आहे. त्यामुळे भारत विश्वचषक विजयापासून अवघे काही पावले दूर आहे.