Shivajirao Kardile | नगर : अहिल्यानगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून महापौर व उपमहापौर पदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी आज (ता. २) सकाळी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीनंतर शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू झाली ती माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांची.
हेही वाचा – वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार : पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
नावावर शिक्कामोर्तब (Shivajirao Kardile)
भाजप व राष्ट्रवादीच्या नवनियुक्ती नगरसेवकांची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये घेतली. या बैठकीत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर उपमहापौरपद भाजपला देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे तर भाजपकडून धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दोघांनीही महापालिकेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सहा फेब्रुवारीला महापालिकेत त्यांच्या नावाची पदासह औपचारिक घोषणा होईल.
अवश्य वाचा – युतीचे ठरले; अहिल्यानगर महापौर पदासाठी ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
शिवाजीराव कर्डिले यांना पाच आपत्य (Shivajirao Kardile)
ज्योती गाडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसऱ्या वेळी नगरसेवक झाल्या आहेत. त्या माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या तर आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत. शिवाजीराव कर्डिले यांना पाच आपत्य. त्यात चार मुली व एक मुलगा. चार मुलींपैकी तीनही मुली नगर शहरातच दिलेल्या आहेत. त्यांच्या हयातीत त्यांचे जावई संदीप कोतकर व संग्राम जगताप हे महापौर, कन्या सुवर्णा कोतकर या उपमहापौर तर त्यांच्या दोन कन्या ज्योती गाडे व शीतल जगताप या नगरसेवक राहिल्या आहेत. यात कर्डिले यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय हात होता, असे सांगितले जाते. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जावई संग्राम जगताप यांनी कर्डिले यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी कर्डिले यांच्या कन्येला महापौर पदी विराजमान करत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली असल्याची चर्चा शहरात आहे. शिवाय राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांना राजकीय बळ देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते.




