BJP : श्रीरामपूर: शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Drinking water supply) करणाऱ्या साठवण तलावामध्ये मैलामिश्रित, दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ शहानिशा करून वस्तुस्थिती समोर आणावी, जर खरोखरच श्रीरामपूरकरांना मैलामिश्रित गटारीचे पाणी पिण्यासाठी दिले जात असेल तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी (BJP) शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित; समर्थकांनी केला कौतुकाचा वर्षाव
शहानिशा करून योग्य त्या कार्यवाहीची ग्वाही
शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत असल्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोलप यांनी पुढील २४ तासात या प्रकरणाची शहानिशा करून योग्य त्या कार्यवाहीची ग्वाही भाजप पदाधिकाऱ्यांना दिली.
नक्की वाचा: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; खासदार नीलेश लंके यांची माहिती
अन्यथा सर्वसाधारण सभेत कामकाज करू देणार नाही (BJP)
पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, अन्यथा सर्वसाधारण सभेत हा मुद्दा सोडविल्याशिवाय कामकाज सुरू करू देणार नाही, असा इशारा भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण व स्थायी समिती सदस्य आशिष धनवटे यांनी दिला. हा विषय कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा नसून थेट श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने शहानिशा करून कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड व भाजपचे सरचिटणीस केतन खोरे यांनी मांडली. पिण्याच्या पाण्यात मैला सोडण्याचे घाणेरडे कृत्य धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणा दूर करण्याची मागणी नगरसेवक संजय गांगड व रवी पाटील यांनी केली.
सहा महिन्यांपूर्वी अशी घटना घडली असून याबाबत पुढे काय झाले ? शाश्वत उपाय कधी काढणार ? असे अनेक प्रश्न माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिपक चव्हाण यांनी उपस्थित केले. व्हायरल व्हिडिओची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, साठवण तलाव आणि पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करावी, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, दोषी आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत असल्याची लेखी हमी द्यावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’
यावेळी महिला भाजप महिला शहराध्यक्षा स्वाती चव्हाण, नगरसेवक मनोज लबडे, पुजा चव्हाण, विशाल अंभोरे, अर्जुन कर्पे, रुपेश हरकल, बाळासाहेब हरदास, अमोल शेटे, प्रतीक वैद्य, सुभोत शेवतेकर, प्रशांत शितोळे, सचिन (मन्नू) धोत्रे, राहुल फुलारे, नवनाथ पवार, किरण पठारे, अवधूत शिंदे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, अजय छल्लारे, किरण कर्नावट, अनिल खंडागळे, सचिन पवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



