Ahilyanagar |अहिल्यानगरमध्ये ‘ब्लॅक फिल्म’ लावणाऱ्या ४५८ वाहनांवर दंडात्मक कारवाई

0

Ahilyanagar | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.  या मोहिमेत एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली.

अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित; समर्थकांनी केला कौतुकाचा वर्षाव

२०२१ वाहनांची कसून तपासणी (Ahilyanagar)

या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली.

हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’

४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या (Ahilyanagar)

 तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत.

दंडात्मक कारवाई (Ahilyanagar)

​या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन (Ahilyanagar)

“जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here