Drugs : नगर : अहिल्यानगर अंमली पदार्थ (Drugs) विक्रीतून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत असल्याने अनेक अवैध धंदा (Illegal Business) करणारे व्यावसायिक या मार्गाकडे वळले आहेत. गांजा, नशेचे इंजेक्शन अशा अंमली पदार्थांची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असून ही चिंतेची बाब ठरत आहे. अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी ‘ड्रग्ज फ्री’ पोलीस ठाणे करण्याचा मानस व्यक्त केला असून, येत्या १५ दिवसात त्यादृष्टीने सर्व पोलीस ठाणेदारांना सूचना देऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर
अमली पदार्थ तस्करीवरील कारवाईच्या मागणी
अहिल्यानगर शहरातील वाहतूक शिस्त, अतिक्रमणे व अमली पदार्थ तस्करीवरील कारवाईच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आज (ता. ६) मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांची विक्री कुठे आणि कशा पध्दतीने चालते, मुले त्याच्या आहारी कशी जात आहेत, याबाबत गंभीर चिंता आहे.
हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
अनेक तरूण या व्यसनाच्या आहारी (Drugs)
पोलिसांकडून गांजा विक्री करणाऱ्यांवर नेहमीच कारवाई केली जाते, मात्र अलिकडच्या काळात श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगर शहरात नशेच्या इंजेक्शनचे प्रमाण वाढले आहे. जिमला जाणाऱ्या तरूणांना ताकद वाढवण्यासाठी आणि नशेसाठी मेफेन्टरमाइन इंजेक्शन परवाना नसताना विकले जात असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली येथून कुरिअरव्दारे हे इंजेक्शन मागवले जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते. अनेक तरूण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून तब्बल १४ कोटी रूपयांची ड्रग्जसदृश पावडर जप्त केली होती.
गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून अनेक वेळा पोलिसांनी त्याचा साठा पकडला आहे. गेल्या काही दिवसांपापूर्वी कोतवाली पोलिसांनी सुमारे १०० किलो गांजा जप्त केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२० किलो गांजा जप्त केला.
शासनाने विशेष मोहिम हाती घेतली असून जिल्हा पोलिसांनीही अंमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगर शहर आदी ठिकाणी अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून तरूण पिढी त्याच्या आहारी गेली आहे. ओडीसातून येत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यात पोलिसांनी सुमारे ११०० किलो गांजा पकडला आहे. अनेक छोट्या टपऱ्यांवर गांजा सहज उपलब्ध आहे. गांजाच्या नशेमुळे तरूण गुन्हेगारी कृत्याकडे वळत असून नशेच्या अवस्थेत स्वतःचे भान हरवतात. तरूण पिढी बरबाद करण्यासाठी गांजा आणि इंजेक्शनसारख्या नशेचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट होते. ड्रग्ज विक्री रॅकेट बाबत मोहीम व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला असून, जिल्ह्यातील वाढता ड्रग्जचा वापर पाहता पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



