Women’s Empowerment : नगर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ (Women’s Empowerment) बनविण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सन फार्मा कंपनी (Sun Pharma) आणि मिटकॉन फोरम सोशल फाउंडेशन (MITCON Forum for Social Development) यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला रिक्षा चालक प्रशिक्षण उपक्रम” (Women Auto Rickshaw Driver Training Initiative) राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील ३० गरजू महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रिक्षा चालविण्याचे तांत्रिक शिक्षण, वाहतुकीचे नियम शिकविणार
या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना रिक्षा चालविण्याचे तांत्रिक शिक्षण, वाहतुकीचे नियम, शहरातील प्रमुख मार्गांची माहिती, तसेच प्रवाशांशी सुसंवादाचे तंत्र शिकविण्यात येणार आहे.
नक्की वाचा: कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर
२५ दिवसांच्या कोर्सद्वारे महिलांना सुसज्ज करणार (Women’s Empowerment)
२० दिवस प्रशिक्षण आणि ५ दिवस माहिती सत्र अशा एकूण २५ दिवसांच्या कोर्सद्वारे महिलांना सुसज्ज करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परमिट मान्यता आणि वाहन खरेदीसाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?
या उपक्रमाद्वारे प्रशिक्षित महिला चालक शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, तसेच एमआयडीसी परिसरातील कामगारांना सुरक्षित वाहतूक सुविधा देणार आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम अहिल्यानगर शहरात सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवास संस्कृती निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
मिटकॉन फोरम सोशल फाउंडेशनचे अकबर शेख म्हणाले, महिलांना रोजगार मिळवून देणे आणि समाजात त्यांचा सन्मान वाढविणे हे आमचे ध्येय आहे. रिक्षा चालक म्हणून महिलांना शहरात सन्माननीय स्थान मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. महिला चालक असल्यास नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल,” असे ते म्हणाले.
या प्रकल्पासाठी रेश्मा आठरे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांपर्यंत ही संधी पोहोचली असून त्या आपल्या पायावर उभ्या राहणार आहेत.
यावेळी सन फार्मा कंपनीचे प्रतिनिधी सोमनाथ दडस, तसेच स्वामिनी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका शीतल सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांना वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, वाहन देखभाल आणि नागरिकांशी संवाद कौशल्य याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
शहरात लवकरच 30 महिला चालकांच्या रिक्षा धावू लागणार असून, अहिल्यानगरच्या वाहतूक क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.



