Sangamner | संगमनेरमध्ये एलसीबीची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई; पाच आरोपी ताब्यात 

0

Sangamner | संगमनेर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर (Sangamner) उपविभागात मोठी कारवाई करत वाळू माफिया तसेच अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर जोरदार घाव घातला आहे. या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेऊन २६ लाख ४५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

विशेष पथक तयार करण्यात आले (Sangamner)

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ व महादेव भांड यांचा समावेश होता.

अवश्य वाचा – जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

डिग्रस गावच्या शिवारात छापा (Sangamner)

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यातील डिग्रस गावच्या शिवारात छापा टाकण्यात आला. यावेळी प्रकाश भाऊसाहेब कोरडकर (वय २०, रा. हजारवाडी) व फिरोज सुलतान शेख (वय २५, रा. डिग्रस) हे दोन आरोपी दोन डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून दोन टाटा कंपनीचे डंपर (किंमत अंदाजे २० लाख रुपये) चार ब्रास वाळू (४० हजार रुपये) असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अवैध गौणखणिज वाहतुकी संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलवर छापा (Sangamner)

तसेच पिंपरणे येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६) याच्याकडून ४४ हजार २४० रुपयांची देशी-विदेशी दारू, ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा ५ लाख ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हा दाखल (Sangamner)

देवगाव येथे निलेश शशिकांत मुन्तोडे व अमोल गुलाब मुन्तोडे हे दोघे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्याकडून ११ हजार ५२० रुपयांची देशी दारू, ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा ६१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे पहा – 731 जागांपैकी 321 जागांचे निकाल हाती..भाजप वरचढ

वाळू तस्करांवर कारवाई (Sangamner)

या एकदिवसीय कारवाईत चार ब्रास वाळू, दोन डंपर, देशी-विदेशी दारू, कार व मोटारसायकल असा एकूण २६ लाख ४५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here