Nilesh Lanke | ‘तौरल इंडिया’ औद्योगिक भविष्याचा मैलाचा दगड; खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

0

Nilesh Lanke | नगर : ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरलेल्या ‘तौरल इंडिया’ या उद्योगसमूहाच्या सुपा एमआयडीसी येथील अत्याधुनिक नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ‘अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळख असलेले तसेच ‘तौरल इंडिया’चे संस्थापक उद्योजक भरत गिते यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

हेही वाचा – प्राचार्य डॉ. विद्याधर औटी यांचे निधन; पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ हरपला

मोठ्या प्रकल्पांची आवश्यकता (Nilesh Lanke)

खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सुपा एमआयडीसीतील ‘तौरल इंडिया’चा हा नवा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्योग, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकास या तिन्ही घटकांना एकाच वेळी चालना देणारे असे प्रकल्प जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी देतात. भविष्यात अहिल्यानगर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखला जावा, यासाठी अशा मोठ्या प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

अवश्य वाचा – झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध (Nilesh Lanke)

या नव्या उत्पादन प्रकल्पामुळे स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणात थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला. केवळ कारखान्यातील नोकऱ्याच नव्हे, तर वाहतूक, पुरवठा साखळी, दुरुस्ती सेवा, निवास, भोजन व्यवस्था आदी पूरक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर थांबून स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या पिढीतील उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी (Nilesh Lanke)

भरत गिते यांच्या उद्योजकीय वाटचालीचे कौतुक करताना खासदार लंके म्हणाले, “अत्यंत स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित असलेल्या अल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रात ‘तौरल इंडिया’ने जागतिक दर्जाचे स्थान मिळवले आहे. सातत्य, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या जोरावर भरत गीते यांनी उभा केलेला हा उद्योग नव्या पिढीतील उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.” मराठी उद्योजक जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करत आहेत, ही बाब अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परिसराचा सर्वांगीण विकास (Nilesh Lanke)

सुपा औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होण्यास गती मिळेल. रस्ते, वीज, पाणीपुरवठा, दळणवळण तसेच सामाजिक सुविधा अधिक सक्षम होतील. याचा थेट फायदा स्थानिक नागरिकांना होणार असून, परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे खासदार लंके यांनी सांगितले.

हे पहा – अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी

‘तौरल इंडिया’सारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीत मोलाचे योगदान देत असल्याचे नमूद करत खासदार लंके म्हणाले, “राज्याच्या औद्योगिक विकासात अहिल्यानगर जिल्ह्याचे योगदान अधिक ठळक व्हावे, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. ‘तौरल इंडिया’ने भविष्यात आणखी मोठे यश मिळवावे आणि राज्याच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, हीच सदिच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here