Kidnapping Attempt : शेवगाव : शेवगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न (Kidnapping Attempt) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र संबंधित मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करून घेत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत (Student Safety) गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अवश्य वाचा: बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
दुसऱ्या गावात शिकवणीसाठी जातांना घडली घटना
तालुक्यातील एका गावात राहणारी पाचवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी सुमारे चार किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावात खासगी शिकवणीसाठी सायकलवरून ये-जा करते. बुधवारी (दि. ११) सकाळी साडेसातच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना रस्त्यात तिच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.
हे देखील वाचा: अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी
एकटी असल्याचे पाहून गाडीत ओढण्याचा प्रयत्न (Kidnapping Attempt)
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातून आलेल्या तिघांनी मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेत बाजूला पळ काढला. त्याचवेळी समोरून दुसरे वाहन येताना दिसल्याने संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून विशेषतः दहावी-बारावीच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील अनेक मुले-मुली सायकलवरून शाळेत ये-जा करत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांनी एकटे न जाता गटागटाने प्रवास करावा आणि पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे समजते.



