Career : पारनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी जागतिक संधींपासून त्यांना वंचित राहावे लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी पारनेर महाविद्यालय आणि अमेरिकेतील ‘ग्लोबल नगरी फाउंडेशन’ (Global Nagri Foundation) यांनी एक ऐतिहासिक (Historical) पाऊल उचलले आहे. या दोन्ही संस्थांमध्ये नुकताच ‘मेंटॉर मित्र’ या अभिनव उपक्रमांतर्गत समन्वय करार करण्यात आला आहे. यामुळे आता पारनेरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी थेट जागतिक करिअरच्या (Career) संधी उपलब्ध झाल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत अमेरिका (America), कॅनडा (Canada) आणि इंग्लंड (England) यांसारख्या विकसित देशांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असणारे भारतीय तज्ज्ञ आणि मार्गदर्शक पारनेरच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. दर १५ दिवसांनी ऑनलाईन माध्यमातून हे सत्र पार पडणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले गाव आणि महाविद्यालय न सोडता परदेशातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
नक्की वाचा : बुरुडगाव रस्त्यावरील ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध; नगरसेविका मीना चोपडा यांचे आयुक्तांकडे निवेदन
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन होणार प्राप्त
‘मेंटॉर मित्र’ उपक्रमाचा उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. उच्च शिक्षण प्रक्रिया, विविध शिष्यवृत्ती आणि प्रवेश प्रक्रिया.आयटी (IT), वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक संधी. सॉफ्ट स्किल्स, प्रभावी संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास निर्मिती.आर्थिक नियोजन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप्स आणि संशोधन. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन प्राप्त होण्यास मदत होईल. परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, तेथील सांस्कृतिक बदलांशी जुळवून घेण्याची तयारी आणि भविष्यातील स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये या उपक्रमातून विकसित होतील.
अवश्य वाचा : शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी
तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम कार्यरत (Career)
ग्लोबल नगरी फाउंडेशनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट रोहित काळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावेल.” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम कार्यरत आहे. यामध्ये डॉ. विजय काळे, डॉ. रोहित काळे, डॉ. तुकाराम थोपटे, प्रा. रामदास घोलप, प्रा. अनिल ढोले, डॉ. सरिता कुंडलीकर, प्रा. निलेश पवार आणि श्री. विलास भापकर हे पुढील नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. या करारामुळे पारनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.



