Accused Arrested | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कोठला परिसरात गोळीबार करणारे दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी ताब्यात (Accused Arrested) घेतले आहेत. कादर ऊर्फ पप्पू मुस्सा शेख (वय ३८ रा. कोठला झोपडपट्टी, अहिल्यानगर), जैद ऊर्फ टैप्या रशीद सय्यद (वय ३५, रा. आलमगीर, ता. अहिल्यानगर) यांना अहिल्यानगर शहरातून ताब्यात घेतले आहे. दोघेही संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हे वाचा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?
संगनमताने कट
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अबरार मुक्तर शेख यांनी अफजल आसीर शेख व अस्लम असीर शेख यांचेविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल केलेला गुन्हा मागे घेत नाही याचा मनात राग धरुन आरोपी जैद सय्यद, जाबीर सादिक सय्यद, अफजल आसीर शेख, अस्लम असीर शेख, अल्ताफ शेख (सर्व रा. मुकुंदनगर अहिल्यानगर) यांनी संगनमताने कट रचुन फिर्यादी अबरार मुक्तर शेख (वय २४, रा. प्रबुध्दनगर, आलमगीर, भिंगार ता.जि. अहिल्यानगर) हा त्याचे मित्र अभिषेक पवार याचे मोपेड दुचाकीवर बसुन मुकुंदनगर येथे जात होते. राज चेंबर समोर कोठला, येथे दुचाकीला ऑटो रिक्षा आडवी लावुन गावठी कट्याने फिर्यादीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात फिर्यादी अबरार शेख जखमी झाला होता. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी मुकुंदनगर परिसरात व आलमगीर परिसरात सापळा रचून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.
हे पहा – ज्योतिषाच्या सल्ल्याने पेटला सूडाचा वणवा;पोटच्या मुलीनेच घेतला आईचा जीव
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी जैद सय्यद हा रेकार्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे १५ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार विजय पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे, सुनील पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, अमृत आढाव, सागर ससाणे, अर्जुन बडे तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार रियाज इनामदार, युजय हिवाळे, सुमित गवळी, कपिल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.



