AMC | माझी वसुंधरा ५.० अभियानात अहिल्यानगर महापालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार

0

AMC | नगर : महाराष्ट्र (Maharashtra) शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महापालिकेला (AMC) सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानात विशेष मेहनत घेऊन केलेल्या उपाययोजना, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन यामुळे, तसेच नागरिकांच्या व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे महापालिका ही कामगिरी करू शकली, अशी भावना महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.

हे वाचा – ’मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो’;हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली ‘त्या’ वक्तव्याची माफी

गेली दोन वर्षे महापालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक

माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महापालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महापालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला आहे. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महापालिका ही कामगिरी करू शकली.

नक्की वाचा: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक

१३.५० कोटी इतके पारितोषिक प्राप्त

यापूर्वी अहिल्यानगर महापालिकेने माजी वसुंधरा अभियान २.० मध्ये १.५० कोटी, ३.० मध्ये ६.०० कोटी व ४.० मध्ये ६.०० कोटी असे एकूण १३.५० कोटी इतके पारितोषिक प्राप्त केले आहे. शहरात विविध उद्याने हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच वसुंधरेबाबत जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये हरित शपथ घेण्यामध्ये अहिल्यानगर महापालिका राज्यात तीन ते दहा लक्ष लोकसंख्ये गटामध्ये प्रथम स्थानी होती. शहरातील एक लाख ४८ हजार ८९५ नागरिकांनी वैयक्तिक हरित शपथ घेतली. तर २००२ समुहांनी सामूहिक शपथ घेतली होती, असेही आयुक्त डांगे यांनी सांगितले. माझी वसुंधरा ६.० या अभियानात अहिल्यानगर महापालिकेने तीन ते दहा लक्ष लोकसंख्ये गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

हे पहा – अपप्रचार नियोजनपूर्वक पसरविला; हर्षवर्धन सपकाळांनी दिलगिरी मागतानाही भाजपला घेरले !

भूमी : या घटका अंतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा कायम ठेवला.

वायू : या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवतात शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली.

जल : या घटकात मनपाने शहरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाय योजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील सीना नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व नागरिकांनी खरेदी करावी यासाठी प्रयत्न केले.

अग्नी : या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध ठिकाणी सोलार प्लांट लावले. खाजगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या.

आकाश : या घटकात मनपाने नागरिकांमध्ये अभियानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरण प्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमाद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सर्व उपाययोजांमुळे महापालिकेला या वर्षीही पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here