Criminal Trespass: विनापरवाना कुणाच्या आवारात शिरल्यास कोणत्या नियमांचा भंग होतो? 

0
Criminal Trespass:विनापरवाना कुणाच्या आवारात शिरल्यास कोणत्या नियमांचा भंग होतो? 
Criminal Trespass:विनापरवाना कुणाच्या आवारात शिरल्यास कोणत्या नियमांचा भंग होतो? 

नगर: ‘तुमच्या घराचे दरवाजे आज सुरक्षित आहेत का’? ऑर्डर पोहोचवण्यासाठी आलेला डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) जर थेट तुमच्या घरात न विचारता आला तर(Criminal Trespass) ? हो,अशीच एक धक्कादायक घटना आपल्या अहिल्यानगर शहरात घडली आहे. अहिल्यानगर शहरातील एका ‘इन्स्टंट डिलिव्हरी अँपच्या (Instant delivery app) डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरी द्यायला गेलेल्या कस्टमरच्या घरी जाऊन बेशिस्त वर्तन (Unruly Behavior)केल्याचे समोर आलं आहे. कविजंगनगर परिसरातील एका ग्राहकासोबत ही घटना घडली आहे. या ग्राहकाने काही फूड प्रोडक्टस या ‘इन्स्टंट डिलिव्हरी अँपवरून ऑर्डर केले होते.

नक्की वाचा : १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली! 

मात्र ज्यावेळी कोणतेही डिलिव्हरी द्यायला जेव्हा डिलिव्हरी बॉय घरी येतो, तेव्हा त्या अगोदर आपल्याला कंपनीकडून त्याचा एक फोन येतो. मात्र या ग्राहकाच्या बाबतीत असं न होता हा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन थेट त्यांच्या घरात कोणतीही पूर्वसूचना न देता घुसला. साधारण पणे आपण देखील जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात जातो तेव्हा आपण दरवाजाची बेल वाजवतो किंवा जाण्यापूर्वी एखादा फोन तरी करतो. मात्र या डिलिव्हरी बॉयने असं काहीच केलं नाही. उलट मी तुम्हाला कॉल केला होता तुम्ही उचलला का नाही असा खोटा सवाल पार्सल ऑर्डर करणाऱ्या महिलांनी केला.

ज्यावेळी या महिलांनी स्वतःचा फोन दाखवत तुमचा कुठलाही कॉल आला नाही,असं सांगितलं तेव्हा त्याने लगेच बाजी पलटवत मी तुम्हाला फोन केला होता, मात्र तुमचा फोन नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं. मात्र अचानक एखादा व्यक्ती घरात आल्याने त्या घरात राहणाऱ्या महिला गोंधळून गेल्या होत्या. तसेच या डिलिव्हरी बॉयचे बोलणं देखील असभ्य होत. अशा घटना जर आपल्या शहरात घडत असतील. तर शहरातील नागरिकांनी खूप जागरूक राहणे गरजेचं आहे.  

अवश्य वाचा: राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी तर ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये;राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नैतिक मूल्ये कोणती ? (Criminal Trespass)

जेव्हा एखादा डिलिव्हरी बॉय विनापरवानगी तुमच्या खाजगी आवारात प्रवेश करतो, तेव्हा त्याने फक्त कायद्याचेच नाही, तर अनेक नैतिक मूल्यांचे देखील उल्लंघन केलेले असते. त्यात
नैतिकतेच्या दृष्टीने विचार केल्यास काही मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार होतो.

१. दुसऱ्याच्या गोपनीयतेचा आदर करणे – प्रत्येक व्यक्तीचे घर किंवा आवार हे त्याचे खाजगी क्षेत्र असते. तिथे कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. विनापरवानगी आत येणे हे ‘दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप न करणे’ या मूलभूत नैतिक मूल्याच्या विरोधात आहे.

२. शिष्टाचार आणि सभ्यता  – कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना किंवा सामान्य जीवनातही  बेल वाजवणे किंवा समोरच्याने “आत या” म्हणण्याची वाट पाहणे हा सभ्यतेचा भाग आहे. परवानगी शिवाय आत शिरणे हे असंस्कारी किंवा उद्धटपणाचे लक्षण मानले जाते.

३. मर्यादेचे भान – एक व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात एक ‘अदृश्य मर्यादा’ असते. डिलिव्हरी बॉयने ही मर्यादा ओळखणे आवश्यक आहे. ही मर्यादा ओलांडणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटू शकते.

४. विश्वास – जेव्हा आपण एखाद्या कंपनीकडून सेवा घेतो, तेव्हा आपण त्या कंपनीच्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवतो. विनापरवानगी आवारात शिरल्यामुळे त्या  ‘ग्राहकाचा विश्वास’ तुटतो.

५. संमतीचे महत्त्व –  कोणत्याही कृतीसाठी समोरच्या व्यक्तीची संमती घेणे हे एक महत्त्वाचे नैतिक मूल्य आहे. “मी आत येऊ का?” किंवा “मी इथे वस्तू ठेवू का?” असे न विचारता थेट आत येणे हे या  तत्त्वाचा अवमान करण्यासारखं आहे.

 तसेच जर एखादा डिलिव्हरी बॉय तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या खाजगी आवारात शिरला, तर त्याने सुद्धा अनेक नियमांचे उल्लंघन केलेलं असत. यामध्ये

१. अनधिकृत प्रवेश – भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२९ (पूर्वीचे भारतीय दंड विधान – IPC कलम ४४१) नुसार, जर कोणी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीच्या जागेत विनापरवानगी किंवा धमकावण्याच्या उद्देशाने प्रवेश करत असेल, तर त्याला ‘क्रिमिनल ट्रेस्पस’ किंवा ‘अनधिकृत प्रवेश’ मानले जाते.

२.सोसायटी किंवा वसाहतीचे नियम – अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाबाबत कडक नियमावली असते.त्यासाठी गेट पास घेणं गरजेचं असतं. त्यात काही ठिकाणी डिलिव्हरी बॉयना फक्त गेटपर्यंतच परवानगी असते, तरीही ते आत आले तर तो नियमांचा भंग होतो.

३. डिलिव्हरी कंपनीची आचारसंहिता – प्रत्येक डिलिव्हरी कंपन्यांचे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही शिस्तीचे नियम असतात. त्यानुसार, त्यांना ग्राहकाच्या दारापर्यंत जाण्याची परवानगी असते, पण घराच्या आत शिरण्याची परवानगी नसते. परवानगीशिवाय आत येणे हे कंपनीच्या ‘सेवा अटी’ नुसार चुकीचे असत.याचा भंग झाल्यास कंपनी त्या व्यक्तीला कामावरून काढून देखील टाकू शकते.

त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने काही एथिक्सचे पालन हे केलेच पाहिजे. अन्यथा कोणत्याही ग्राहकाला आपल्या झालेल्या त्रासामुळे कंपनीकडे तक्रार करून  न्यायालयात दाद मागण्याची मुभा असते. त्यामुळे असे जर प्रकार तुमच्यासोबत ग्राहक असताना घडत असतील. तर तुम्ही देखील याविरोधात आवाज उठविला पाहिजे. तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी कंपनीने सुद्धा आपले नियम हे आणखी कडक करायला हवेत.