सलग पाचव्या वर्षी रक्तदानातून मानवंदना; महिलांचा उल्लेखनीय सहभाग
Shiv Jayanti : नगर : अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) प्रधान डाकघर, अहिल्यानगर येथे सलग पाचव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून अभूतपूर्व मानवंदना अर्पण करण्यात आली. “शिवछत्रपतींचे विचार हीच आमची प्रेरणा,” असे प्रतिपादन डाक विभागाचे प्रवर अधीक्षक विकास पालवे (Vikas Palve) यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) वंदनाने करण्यात आली. विकास पालवे यांच्या हस्ते पूजन पार पडले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण कार्यालयीन परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण शिवमय झाले.
नक्की वाचा : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला ‘वेठबिगारी’; शिक्षण विभागाचा छळ
कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिवजन्मोत्सव २०२६ निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिवचरित्रावर विकास पालवे, सिने दिग्दर्शक अक्षय इंदिकर, अमेय निमसूडकर आणि अमृत कुमटकर यांनी प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. मांडवगण येथील दिवंगत डाक कर्मचारी कै. पोतदार यांच्या पत्नीला पिको-फॉल मशीन भेट देऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून व्यक्त करण्यात आली. सायंकाळी आयोजित रक्तदान शिबिरात डाक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. शिबिरासाठी अष्टविनायक ब्लड बँक, अहिल्यानगर यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.
अवश्य वाचा : राहाता तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांमध्ये शिवभक्तीची ऊर्जा (Shiv Jayanti)
“गाथा शिवरायांची” या विषयावर शिवशाहीर आदिनाथ बडगे यांनी सहकाऱ्यांसह सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांमध्ये शिवभक्तीची ऊर्जा चेतवली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी ऐतिहासिक मूर्तीपूजन व जिजाऊ वंदन गीत सादर करण्यात आले. यावेळी उपअधीक्षक अमेय निमसूडकर, पोस्टमास्तर अमृत कुमटकर, सहाय्यक अधीक्षक राजेश नेहरकर, रविकुमार झावरे, संतोष यादव, हनुमंत चव्हाण,नितीन थोरवे, संतोष घुले, सुखदेव पालवे,सचिन थोरवे,मोनाली हिंगे,ऋषीकेश कार्ले तान्हाजी सूर्यवंशी,सागर पंचारिया, यांच्यासह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कमलेश मिरगणे यांनी तर आभार प्रदर्शन ऋषिकेश कार्ले यांनी केले.



