Free Health Camp | नगर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी येथील भाई दया सिंहजी गुरुद्वारा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी (Free Health Camp) व रक्तदान शिबिराचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते करण्यात आले.
हे वाचा – पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १९ जणांचा मृत्यू

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Free Health Camp)
अहिल्यानगर महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच भाई दया सिंह जी गुरुद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग यांच्यासह गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!

निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले… (Free Health Camp)
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, “श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी मानवतेसाठी व धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व सायकल रॅलीसारखे उपक्रम ही समाजसेवेची उत्तम उदाहरणे आहेत. निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करावी व रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे. तसेच, प्रशासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

या शिबिरात फिजिशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, दंततज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली.

माहिती व नोंदणीची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध (Free Health Camp)
रक्तदाब, मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, छातीचा एक्स-रे, तसेच विविध प्रयोगशाळा तपासण्या आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय हृदयविकार, नेत्ररोग, मोतीबिंदू, कॅन्सर यांसारख्या आजारांबाबत मार्गदर्शन करून आवश्यकतेनुसार संदर्भ सेवाही देण्यात आली. शिबिराच्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना कार्ड, आभा कार्ड आणि शिधापत्रिका आदी शासकीय योजनांबाबत माहिती व नोंदणीची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

या उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला व “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असल्याचा संदेश दिला.



