
Ahilyanagar MNC : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar MNC) स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी २६ फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्षाच्या गटनेत्यांकडून बंद पाकिटात स्वीकृत सदस्यांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे. त्यानंतर महापौरांकडून (Mayor) स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकांच्या (Approved corporator) निवडीची जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडे असल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच
कोणाला किती जागा?
अहिल्यानगर महापालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला ३, भाजपला २ तर शिवसेना पक्षाच्या वाट्याला १ जागा आली आहे. त्यासाठी अनेकजणांनी फिल्डिंग लावली आहे. सध्या इच्छुकांकडून वरिष्ठ नेत्यांची मनधरणी सुरु असल्याची चर्चा आहे. यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांना सव्वा वर्षे पदाची संधी मिळणार असल्याचे संबंधित पक्षांकडून याआधीच घोषित करण्यात आले आहे.
हे पहा : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुजय विखे यांची निवड
यांची नावे चर्चेत (Ahilyanagar MNC)
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावान असलेले संग्राम सूर्यवंशी, अभिजीत खोसे, मळू गाडळकर यांची तर भाजपकडून माजी नगरसेवक रामदास आंधळे, भाजपचे सावेडी विभाग प्रमुख ज्ञानेश्वर काळे, संगीता खरमाळे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांच्या नावांचा विचार होऊ शकतो, असा सूर अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातून उमटत आहे.
शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी शहरप्रमुख सचिन जाधव, विक्रम राठोड, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. त्यातील अनेकांनी इच्छुक असल्याचे बोलूनही दाखविले आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


