Gang Arrested : पाथर्डी: पाथर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठा गुन्हेगारीचा कट उधळून लावला आहे. अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला लुटण्याचा तसेच एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुणे जिल्ह्यातील टोळीचा (Gang Arrested) पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून संबंधित व्यापारी दररोज दुकान बंद केल्यानंतर लाखो रुपयांची रोकड सोबत घेऊन जात असल्याची रेकी आरोपींकडून करण्यात आली होती. तसेच एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी घेतल्याचीही माहिती पुढे येत आहे.
अवश्य वाचा- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील संघर्षाने जागतिक व्यापारात मोठे वादळ
आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे हस्तगत (Gang Arrested)
या प्रकरणी पाच आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली असून दोघे पसार झाले आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी ही माहिती दिली. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. अनिकेत शामवेल शिंदे (वय २२, रा. शितलानगर, देहूरोड, पुणे) याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पाचही आरोपी पुणे जिल्ह्यातील असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नक्की वाचा- राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित 8 संशयितांना अटक
स्थानिक माहिती, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघांना अटक (Gang Arrested)
स्थानिक माहिती, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून धक्कादायक बाबी समोर आल्या. अहिल्यानगर शहरातील एक व्यापारी दररोज लाखो रुपयांची रोकड दुकान बंद केल्यानंतर घरी घेऊन जात असल्याची माहिती मिळवून आरोपींकडून त्याची रेकी करण्यात आली होती. योग्य संधी साधून लूटमार करण्याचा त्यांचा बेत होता.याशिवाय एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी या टोळीने स्वीकारल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ही टोळी केवळ चोरी-लूटमारपुरती मर्यादित नसून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी लूट आणि हत्येचा कट उधळण्यात यश आले आहे.



