Bribery : संगमनेर : आश्वी येथील तलाठ्यावर कारवाई होऊन आठवडा उलटला नसताना संगमनेर महसूल विभागात पुन्हा लाचलुचपतची घटना समोर आली आहे. संगमनेर तहसील कार्यालयातील लिपिक (Clerk) कैलास खाडे याने वाटप पत्राचा आदेश देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच (Bribery) मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Maharashtra State Anti-Corruption Department) (अहिल्यानगर) पथकाने गुरुवारी दुपारी ४ वाजता सापळा रचून त्याला रंगेहात पकडले आहे.
नक्की वाचा : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
थेट एसीबीकडे तक्रार
तक्रारदाराला मालमत्तेच्या वाटप पत्रासाठी तहसील कार्यालयात आदेश आवश्यक होता. संबंधित सर्व कागदपत्रे व कायदेशीर पूर्तता पूर्ण असूनही लिपिक खाडे हा वारंवार टाळाटाळ करत होता. त्याने वरिष्ठांच्या नावाखाली १३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्यास असमर्थता दर्शवूनही खाडे याने “पैसे लागतीलच” अशी भूमिका घेतल्याचे समजते. भ्रष्टाचाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेत तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी तहसील कार्यालय परिसरातील एका चहाच्या टपरीवर सापळा रचण्यात आला. ठरलेली रक्कम देताच आणि पैसे मोजत असताना एसीबी पथकाने झडप घालून खाडे याला ताब्यात घेतले. अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
अवश्य वाचा : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद
मागील काही दिवसांत लाचलुचपतच्या अनेक कारवाया (Bribery)
कैलास खाडे याच्याविरोधात यापूर्वीही नागरिकांकडून पैशांची मागणी व अडवणूक केल्याच्या तक्रारी असल्याची चर्चा आहे. तो पूर्वी अकोले तहसीलमध्ये कार्यरत होता. तेथील कामकाजादरम्यान नागरिकांना त्रास दिल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.संगमनेर महसूल विभागात मागील काही दिवसांत लाचलुचपतच्या अनेक कारवाया झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तलाठ्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर आता अव्वल कारकूनावर १३ हजारांच्या लाचेप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.



