
प्रशासकीय शिस्तीचे धिंडवडे; मार्चअखेरच्या कामांऐवजी स्नेहभोजनावरच भर..
Shrigonda Panchayat Samiti : राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ (Mukhyamantri Samruddhi Panchayat Raj Abhiyan) प्रभावीपणे राबवण्याचे ढोल वाजवले जात असताना, श्रीगोंदा पंचायत समितीत (Shrigonda Panchayat Samiti) मात्र या अभियानाच्या नावाखाली प्रशासकीय वेळेची उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या सभागृहात एक खाजगी पतसंस्था’ आणि काही अधिकारी आणि कर्मचारी नेत्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू आणि सत्कार समारंभाच्या ‘इव्हेंटबाजी’मुळे सर्वसामान्यांतून (Common Man) तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
पंचायत समितीची यंत्रणा गुंतली सोहळ्यात
फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चअखेरचे वेध लागले आहेत. विकासकामांच्या निधीचा ताळमेळ बसवणे आणि प्रलंबित फाईल्सचा निपटारा करणे आवश्यक असताना, संपूर्ण पंचायत समितीची यंत्रणा या सोहळ्यात गुंतली होती. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धकांचा सत्कार करणे स्वागतार्ह असले, तरी त्यासाठी कार्यालयीन वेळ खर्ची घालून कामकाज ठप्प करणे कितपत योग्य आहे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
कर्मचाऱ्यांना ‘पत्नीसह’ कार्यक्रम व स्नेह भोजनाचे निमंत्रण (Shrigonda Panchayat Samiti)
सकाळी ११ ही वेळ ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची असते. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी हळदी-कुंकू आणि स्नेहभोजनात व्यस्त असल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शासकीय व्हॉट्सॲप ग्रुपवर कर्मचाऱ्यांना ‘पत्नीसह’ कार्यक्रमासाठी तसेच स्नेह भोजनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. यामुळे हे शासकीय कार्यालय आहे की एखादे ‘मंगल कार्यालय’, असा खोचक सवाल नागरिक विचारत आहेत.
एका खाजगी पतसंस्था’ आणि काही अधिकारी कर्मचारी नेत्यांच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यामुळे प्रशासकीय गाडा पूर्णपणे रुतल्याचे पाहायला मिळाले. सरकारी कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे की एखाद्या खाजगी संस्थेच्या हौस-मौजेसाठी? असा सवाल आता विचारला जात आहे. आता या ‘प्रकाराची वरिष्ठ प्रशासन दखल घेणार का? की अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या ‘इव्हेंटबाजी’कडे डोळेझाक केली जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“एकीकडे प्रलंबित कामांचा डोंगर आहे, तर दुसरीकडे अधिकारी खाजगी पतसंस्थेने शासकीय कार्यालयात आयोजित स्नेहभोजनात व्यस्त आहेत. हेच का ‘समृद्ध पंचायतराज’चे लक्षण?” खाजगी पतसंस्थेला शासकीय वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम आणि स्नेह भोजनासाठी परवानगी कशी ? देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


