वीज-पाण्यासाठी ग्रामस्थांचा संताप; मतदानावर बहिष्काराचा इशारा
Azadi Ka Amrit Mahotsav : संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगांव माथा गावाअंतर्गत असलेल्या कारेवाडीच्या गणपती वस्तीवर आजही मुलभूत सुविधांची भीषण वानवा आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही (Azadi Ka Amrit Mahotsav) येथे ना वीज, ना पिण्याच्या पाण्याची (Drinking Water) सोय झालेली नसल्याने आम्ही जगाच्या नकाशावर आहोत की नाही? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत शासन-प्रशासनाच्या (Governance-Administration) उदासीनतेविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
परिसरालगत जंगल असल्याने हिंस्र प्राण्यांची भीती
कारेवाडीच्या गणपती वस्ती परिसरात सुमारे दहा ते पंधरा घरे आहेत. मात्र आजही या घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही. परिणामी रात्री काळ्याकुट्ट अंधारात काढाव्या लागतात. परिसराला लागून मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने हिंस्र प्राण्यांची भीतीही कायम असते. वीज मिळावी यासाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे दोन वेळा कोटेशन भरले; मात्र ठोस कार्यवाहीऐवजी उडवाउडवीची उत्तरेच मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
पोल टाकले पण प्रत्यक्ष वीजजोडणी नाही (Azadi Ka Amrit Mahotsav)
या प्रश्नाबाबत आमदार किरण लहामटे यांनाही वेळोवेळी निवेदन देऊन माहिती देण्यात आली. मात्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतांसाठी तातडीने वीजेचे पोल टाकण्यात आले. आज त्यावर गंज चढलेला दिसतो. तरीही प्रत्यक्ष वीजजोडणीचे काम झाले नाही आमदारांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शिवाय बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना त्यांच्या कार्यकाळात वारंवार सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले तसेच पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे या निवडणुकीखेरीज इतर वेळी फिरकल्या देखील नाहीत, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते विकास लहांगे यांनी केला आहे.
या वस्तीतील विद्यार्थ्यांची स्थितीतर अधिकच दयनीय आहे. माझा जन्म झाल्यापासून आमच्या घरात मी कधीही लाईटचा दिवा पाहिलेला नाही. मी सध्या दहावीला शिकते. आम्हाला कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागतो, अशी व्यथा विद्यार्थीनी माया लहांगे हिने मांडली.
तर भिवा कवटे म्हणाले, पठार भागाची परिस्थिती अशी झाली आहे की विधानसभेचे मतदान अकोलेला आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीचे मतदान संगमनेर तालुक्यात त्यामूळे दोन्ही कडूनही आम्ही दुर्लक्षीत आहोत — यामुळे आम्ही न घरका न घाटका झालो आहोत. त्यामुळे कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही.
शासनाकडून हर घर जल ’सारख्या योजनांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असला तरी वास्तवात आमच्या महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरलेला नाही, तसेच घरात वीजही नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. वारंवार मागणी करूनही मुलभूत सुविधाच मिळत नसतील तर करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी तातडीने वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



