Bhitad Novel : अहिल्यानगर : ‘भिताड’ कादंबरीत (Bhitad Novel) समाजातील वास्तव चित्रण केले आहे. अडाणी किंवा शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांकडूनच अंधश्रध्दा (Superstition) पाळली जाते असे नव्हे तर शिकलेल्या समाजात आजतागायत अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यातून नरबळी देण्याचे अनेक अघोरी प्रकार घडलेले आहेत. हे सारे झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेमुळे घडत असते. यावर नेमका प्रकाश टाकला आहे. कादंबरीच्या उतरार्धात समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करून आणि विवेकी विचारांची पेरणी करण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम समीक्षक प्रा. डॉ. सुधाकर शेलार (Prof. Dr. Sudhakar Shelar) यांनी काढले.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
‘भिताड’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ
कृषीरंग प्रकाशनाच्या वतीने ‘भिताड’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ बुधवारी (ता. २५ फेब्रुवारी) सीएसआरडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संजय कळमकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे, कृषीरंगच्या माधुरी सचिन चोभे, दिव्य मराठीचे ब्युरो चीफ नितीन पोटलाशेरू, लेखक दीपक कांबळे आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लेखक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
आईच्या उपस्थित झालेला सोहळा अविस्मरणीय (Bhitad Novel)
कार्यक्रमप्रसंगी कोणत्याही प्रकारचे सोपस्कार न करता डॉ. सूर्यकांत वरकड यांनी वामन कर्डक यांचे ‘आनंदाने नादंत होते हिंदू मुसलमान’ या गीत गायनाने प्रकाशन सोहळ्यास सुरुवात केली. डॉ. वरकड यांच्या गायनाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. लेखक दीपक कांबळे यांनी कादंबरी निर्मिती प्रक्रिया आणि अनुभव कथन केले. दिवंगत वडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले मात्र आईच्या उपस्थित झालेला हा सोहळा अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार अरुण वाघमोडे व प्रथम वाचक दिपाली तवले यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दिव्य मराठीचे ब्युरो चीफ नितीन पोटलाशेरू म्हणाले, लेखकाने सूक्ष्म निरीक्षणाने लेखन केल्यामुळे जीवंतपणा जाणवतो. पत्रकारिता करण्यासाठी आवश्यक कौशल्यासोबतच साहित्यकृती निर्माण करण्यासाठीची प्रतिभा दीपक कांबळे यांच्याकडे आहे. त्यांनी अधिकाधिक साहित्यकृती निर्माण कराव्यात.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी बातमीदारी करणे सोपे असते. मात्र, एखादा विषय घेऊन विस्तृत लेखन करताना मोठे शब्दवैभव असावे लागते. भिताड वाचताना लेखकाच्या शब्दवैभवाची प्रचिती येते.
भिताडमुळे होईल समाजमनाचे परिवर्तन : डॉ. कळमकर
साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांचे हस्ते भिताडचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी समाजातील अपप्रवृत्तींवर व्यंगात्मक विनोदी शैलीने बोट ठेवले. ते म्हणाले, भिताड ही रहस्यमय छटा असलेली सामाजिक आशय असणारी कथा आहे. अस्सल नगरी ग्रामीण भाषा व ओघवती शैली ही लेखकाची जमेची बाजू आहे. गूढ आणि रहस्यमय कथांना राज्यभर मोठा वाचकवर्ग आहे. लेखक दीपक कांबळे यांनी भिताडच्या माध्यमातून नैतिक मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिलेला असून यातून समाजमनात परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे यांनी पत्रकारितेतील आपले सहकारी मोठे व्हावेत यासाठी परस्परांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांचे साहित्य राज्यभर पोहचावे यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे म्हटले.
सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे यांनी पत्रकारिता करताना काही मर्यादा येतात. मात्र, कादंबरीच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत नेता येतात. हे भिताडच्या प्रयोगातून समजते. भिताडने सामाजिक मूल्य परिवर्तनाचे आवाहन केले आहे. वाचक यास नक्की प्रतिसाद देतील, असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख डॉ. मेहबूब सय्यद यांनी करून दिली. प्रास्ताविक महादेव गवळी यांनी केले, तर माधुरी चोभे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी केले.



