
ADCC Bank : नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) २१ संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेला मतदार यादी (Voter List) करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या (Cooperative Department) जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यानुसार आता बँक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसाट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार आहे. त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. मतदार यादी कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी राजकीय समीकरणे आखण्यासाठी सुरुवात केली आहे.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
जिल्हा बँकेसह १५३ सोसाट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
दरम्यान, जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणुका मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. तर काहीची प्रक्रिया सुरू होवून ती मध्येच थांबवण्यात आली होती. आता या सर्व निवडणूका पूर्ण करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, नुकतीच ही स्थगिती उठविण्यात आल्याने आता जिल्ह्यात जिल्हा बँकेसह मुळा, लोकनेते मारूतराव घुले, वृद्धेश्वर या तीन सहकारी साखर कारखाना व १५३ सेवा सोसाट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
विद्यमान संचालकांची मुदत २० फेब्रुवारीलाच संपुष्टात (ADCC Bank)
जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत २० फेब्रुवारीलाच संपुष्टात आली आहे. ही मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र, राज्य शासनाने यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता या निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या जागा असून त्यात १४ जागा या सेवा सोसायट्यांसाठी आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना आता मतदानासाठी ठराव द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठराव कोणला मतदान करण्याचा अधिकार देते. यावर निवडणुकीचे गणित ठरते. सहकार खात्याने बँकेला मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सोसायट्यांना ठराव देण्यासाठी महिनाभराची मुदत राहणार आहे.
जिल्हा बँकेसह नगर जिल्ह्यातील अ व ब वर्गातील १५७सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण करण्याचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत. यात जिल्हा बँकेसह तीन बड्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. तसेच ब वर्गातील १५३ संस्थांचा समावेश आहे. जिल्हा बँकेत सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी माहिती देण्याची धावपळ सुरू असून त्यातच आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेत निवडणूक जाहीर होणार की कर्जमाफी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


