Death of cows: पारनेर: तालुक्यातील दैठणे गुंजाळ व नगर तालुक्यातील हिवरे बाजार परिसरात संकरित गायींमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गायी अचानक एक-दोन दिवसांत आजारी पडून दगावत (Death of cows) असल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार काशिनाथ दाते यांनी तातडीने राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देवून त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
अवश्य वाचा- घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
आमदार काशिनाथ दाते यांचा पुढाकार (Death of cows)
जिल्हास्तरीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासण्या केल्या असल्या तरी आजाराचे निश्चित निदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पशुधन हेच उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे रक्षण व त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत असून प्रभावित भागातील ग्रामस्थांनी त्यांच्या हस्तक्षेपाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी राज्यस्तरीय तज्ञ पशुवैद्यकीय पथक तातडीने पाठवून आजाराचे निदान करावे, विशेष आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहीम राबवावी, दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून “खास बाब” म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच भविष्यातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी
आमदार काशिनाथ दाते यांनी केले आहे.



