
Tumbadchi Manjula : नगर : कोकण (Konkan) म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता – खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून (Social Media) या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यातून चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात.. जणू काय घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत हे सांगणारं हे पोस्टर अतिशय औत्सुक्यपूर्ण झालेलं आहे. येत्या ५ जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी (World Environment Day) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
नक्की वाचा: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी
नव्या दमाच्या दिग्दर्शकाचे पदार्पण
विशेष म्हणजे पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचे दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. झी स्टुडिओजच्यावतीने उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटात कोण कोण कलाकार असतील ? याची नेमकी गोष्ट काय असेल ? आणि तुंबाडची ही मंजुळा कोण असेल ? या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट (Tumbadchi Manjula)
या नव्या चित्रपटाबद्दल बोलतांना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर म्हणतात की, ” मराठी प्रेक्षक हा एकाच वेळी जेवढा आधुनिक विचारसरणीचा असतो तेवढाच तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी जोडलेला असतो. यामुळेच आजच्या काळातही आपल्या गावच्या मातीची, तेथील परंपरेची गोष्ट सांगणारा विषय त्याला कायमच भावतो. मागील वर्षी आम्ही आणलेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण. ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे.
सध्या या चित्रपटाचं टीझर पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे. हळूहळू यातील इतर बाबी आम्ही प्रसिद्ध करू ज्यातून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतच जाईल हे मात्र नक्की. यानिमित्ताने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आम्ही घेऊन आलो आहोत याचा विशेष आनंद आहे. “
पहिल्या पोस्टरपासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला तुंबाडची मंजुळा हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


