
Maharashtra State Hamal Mapadi Corporation : नगर : महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ (Maharashtra State Hamal Mapadi Corporation) चे अध्यक्ष स्वर्गीय बाबा आढाव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदाच्या जागेवर आज रविवार दि १ मार्च रोजी पुणे (Pune) येथे महामंडळाची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले (Avinash Ghule) यांची राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्व. आढाव यांच्या स्मृतींना अभिवादन करून बैठकीस प्रारंभ करण्यात आला.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
राज्यातील पदाधिकारी उपस्थित
बैठकीत अध्यक्षपदी विदर्भातील डॉ. बाबा आढाव यांचे निकटचे सहकारी डॉ. हरीश धुरट यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अविनाश घुले यांच्यासह बेठकीस राजकुमार घायाळ (बीड) विकास मगदूम (सांगली) हुसेन पठाण (पुणे), सहचिटणीसआप्पा खताळ (धुळे) शिवाजीराव शिंदे (सोलापूर) हनुमंत बहिरट (पुणे) शेख हसन कादरी (अकोला), गंगाराम कोळेकर (धुळे), कृष्णा चौगुले (कोल्हापूर), गोरख मेंगडे (पुणे) सूर्यकांत स्वामी (नांदेड) आदीं राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी जिल्हा हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे तसेच माथाडी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र भोसले आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी
कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी निर्भीड भूमिका (Maharashtra State Hamal Mapadi Corporation)
नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, स्वर्गीय डॉ बाबा आढाव यांच्या जाण्याने माथाडी व हमाल कामगार चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आयुष्यभर कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी झटत असताना अन्यायाविरोधात निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा जपण्याची जबाबदारी आता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आली आहे. राज्यभरातील हमाल-माथाडी कामगारांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याचा आमचा निर्धार आहे.
घुले पुढे म्हणाले की, कामगारांच्या वेतनवाढीपासून सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन आणि कामाच्या ठिकाणी सन्मान या सर्वच मुद्द्यांवर ठोस धोरण राबविणे आवश्यक आहे. जेथे जेथे कष्टकऱ्यांवर अन्याय होईल तेथे तेथे महामंडळाचा आवाज ठामपणे पोहोचवला जाईल. शासनदरबारी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यात येतील. स्व. बाबा आढाव यांनी उभी केलेली लढाऊ परंपरा अखंडित ठेवत कामगारांच्या हितासाठी नवे उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत स्व. बाबा आढाव यांच्या कार्याला अभिवादन केले. राज्यभरातील हमाल-माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावी नेतृत्व उभे राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


