
AMC: नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) उड्डाणपुलाच्या खांबांवर विनापरवाना जाहिरातीचे पोस्टर (Poster) लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात (Police Station) एका डेव्हलपरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कलम ३ अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी (प्रभाग समिती क्र. २) शेख अजीम चाँद यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी, १ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील मार्केटयार्ड चौक ते कोठी चौक दरम्यान उड्डाणपुलाच्या खांबांची पाहणी सुरू असताना एका खांबावर ‘ओम साई डेव्हलपर्स’तर्फे ‘राधानगरी रांजणगाव कारेगाव एमआयडीसी’मध्ये प्लॉट विक्रीची जाहिरात विनापरवाना लावल्याचे आढळून आले. या जाहिरातीवरील मोबाईल क्रमांकावर अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, त्याचे मालक ऋषी गोरक्ष गोते (रा. उरुळी कांचन) असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्यानंतर, त्यांनी त्वरित याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
हे पहा : संगमनेर शहरातील अतिक्रमणांवर हातोडा
विद्रुपीकरण केल्यास फौजदारी गुन्हे (AMC)
उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिका क्र. १५५/२०२१ च्या अनुषंगाने विनापरवाना फ्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या पार्श्वभूमीवर कडक इशारा दिला आहे. शहरात कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर, उड्डाणपुलांवर, चौकांमध्ये विनापरवाना फलक, बॅनर्स किंवा पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्यास यापुढे थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल, असे आयुक्त यशवंत डांगे स्पष्ट केले आहे.


