Shrigonda : नगर : शासन निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा – १’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यतील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात ७ मार्च ते १३ मे २०२६ या कालावधीत मंडळस्तरावर एकदिवसीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार (Tahsildar) सचिन डोंगरे यांनी केले आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्काळ निकाली काढणे, तक्रारींचा सत्वर निपटारा करणे तसेच महसूल प्रशासन (Revenue Administration) अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या शिबिरांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
हे वाचा : मढी येथील मानाची होळी प्रज्वलित
या गावांत होणार शिबीरे
दि. ७ मार्च २०२६ रोजी काष्टी मंडळासाठी राजयोग मंगल कार्यालय (काष्टी) येथे शिबिर होईल. यानंतर दि. १६ मार्च रोजी चिंभळा मंडळासाठी श्री हंगेश्वर मंदिर (हंगेवाडी), दि. २० मार्च रोजी पेडगाव मंडळासाठी दत्त मंदिर सभागृह (पेडगाव), दि. २७ मार्च रोजी आढळगाव मंडळासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान (आढळगाव), दि. २ एप्रिल रोजी बेलवंडी बु. मंडळासाठी श्री छत्रपती विद्यालय हॉल (बेलवंडी बु.), दि. १० एप्रिल रोजी देवदैठण मंडळासाठी महादेव मंदिर (देवदैठण)
दि. १७ एप्रिल रोजी लोणी व्यंकनाथ मंडळासाठी जिजाई मंगल कार्यालय (लोणी व्यंकनाथ), दि. २१ एप्रिल रोजी मांडवगण मंडळासाठी श्री संत सावतामाळी मंदिर सभागृह (मांडवगण) आणि दि. २३ एप्रिल रोजी भानगाव मंडळासाठी श्री भानेश्वर (महादेव) मंदिर (भानगाव) येथे शिबिरे होणार आहेत. तसेच, दि. ८ मे २०२६ रोजी श्रीगोंदा मंडळासाठी तुळशीदास मंगल कार्यालय (श्रीगोंदा) येथे तर दि. १३ मे २०२६ रोजी कोळगाव मंडळासाठी सैनिक सांस्कृतिक भवन (वीर भवन), कोळगाव येथे हे शिबिर पार पडेल.
नक्की पहा : साई समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट
तातडीने कार्यवाही होणार (Shrigonda)
या शिबिरात विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, तक्रारींचे निवारण तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.



