
Competitive Exam : नगर : सुविधांची वाणवा आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची (Competitive Exam) तयारी करायची असेल तर ग्रामीण भागातील मुलांना शहरात जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यात वेळ वाया जातो आणि घर सोडून राहावे लागते. हीच समस्या ओळखून पोखर्डी (ता. अहिल्यानगर) ग्रामपंचायतीने (Grampanchayat) ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत अभ्यासिका/वाचनालय उभारले आहे. येथे अभ्यासासाठी एक रुपयाही शुल्क घेतले जात नाही. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) हा उपक्रम खूप मोठी मदत ठरतोय.
हेही वाचा : नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार; १०० कोटीचा निधी वितरित
अनोखे पाऊल
सामान्यतः ग्रामपंचायतीकडून फक्त रस्ते, पाणी, पथदिवे अशा नागरी सुविधांची अपेक्षा असते. पण पोखर्डी ग्रामपंचायतीने भविष्यातील पिढीच्या शिक्षणाचा विचार करून एक अनोखे पाऊल टाकले आहे. या वाचनालयात पोखर्डी गावाबरोबरच आसपासच्या १० ते १२ गावांमधील विद्यार्थी रोज येऊन अभ्यास करतात.
आतापर्यंत या वाचनालयातून ८ ते ९ विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदांवर रुजू झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल होऊन गावाचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करत आहेत. यापुढे या वाचनालयातून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे.
– अंतू वारुळे, सरपंच, पोखर्डी ग्रामपंचायत
हे पहा : घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग
विद्यार्थ्यांसाठी या सुविधा (Competitive Exam)
एकाच वेळी सुमारे ७० जणांना आरामात बसून अभ्यास करता येईल अशी क्षमता आहे. स्वतंत्र खुर्च्या-टेबल्सची व्यवस्था असून, पूर्ण स्वच्छ आणि शांत जागेत अभ्यास करता येतो. सरपंच अंतू वारुळे यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या वाचनालयात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, मोफत वाय-फाय, अखंड वीजपुरवठा आणि इतर गरजेच्या सुविधा पुरवल्या आहेत. दुचाकी पार्किंगची स्वतंत्र सोय असून, संपूर्ण ठिकाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची पुस्तकेही ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील मुलांना शहरात जाण्याची गरजच संपली आहे.


