Remove encroachment: संगमनेर: शहरातील वाहतुकीचा कोंडमारा कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी संगमनेर नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख व अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम (Remove encroachment) जोरात सुरू करण्यात आली आहे. अकोले बायपास, बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड तसेच बसस्थानक ते ऑरेंज कॉर्नर हा मार्ग हे संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचे आणि सतत रहदारी असलेले रस्ते आहेत. या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने किरकोळ अतिक्रमणाचाही थेट परिणाम वाहतुकीवर आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर होत होता.
अवश्य वाचा- खामेनेईंच्या मृत्यूवर रडणारे शहीद सैनिकांसाठी रस्त्यावर का येत नाहीत : आमदार संग्राम जगताप
रस्त्यावरच दुकानांचा विस्तार करून अतिक्रमण (Remove encroachment)
या परिसरात फळांची दुकाने, नाश्त्याचे स्टॉल, हातगाड्या, तसेच काही मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकानांचा विस्तार करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत चालली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसा मिळूनही अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने आणि अतिक्रमण हटवले नाही. अखेर आज सकाळपासून नगरपालिकेने थेट कारवाई करत जेसीबी व कर्मचारी पथकाच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा- आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात
नियम तोडणाऱ्यांवर पुढील काळात दंडात्मक कारवाई (Remove encroachment)
या कारवाईदरम्यान रस्त्यावर ठेवलेली दुकाने, शेड, फलक आणि हातगाड्या हटवण्यात आल्या. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचा विरोध पाहायला मिळाला, मात्र पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. नगरपालिकेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, नियम तोडणाऱ्यांवर पुढील काळात दंडात्मक कारवाईही केली जाणार असून अतिक्रमण पुन्हा केल्यास कठोर भूमिका घेतली जाईल. दरम्यान, शहरातील सामान्य नागरिक आणि वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, रस्ते मोकळे झाल्यासच संगमनेर शहरात सुरळीत वाहतूक होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.



