Madhi Yatra | श्री क्षेत्र कानिफनाथ मढी यात्रा महोत्सवासाठी व्यापक तयारी

स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया सुरू

0

Madhi Yatra: पाथर्डी: श्री क्षेत्र कानिफनाथ मढी येथे ८ मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवासाठी (Madhi Yatra) देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे. नव्याने कार्यरत झालेल्या विश्वस्त मंडळाने अवघ्या एका महिन्यात सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, वीजपुरवठा आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधांची उभारणी करून यात्रास्थळ सज्ज केले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी दिली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मंदिर व परिसरात ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून पोलीस यंत्रणेसाठी स्वतंत्र कॅमेरे बसविण्यात येत आहेत. गर्दीचे व्यवस्थापन व सतत देखरेखीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

अवश्य वाचा- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता : सुजय विखे पाटील

स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया सुरू (Madhi Yatra)

दर्शन रांगेची व मंदिर संरचनेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात राहणार असून ठिकठिकाणी फायर एक्स्टिंग्विशरची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने वैद्यकीय पथक यात्रास्थळी उपलब्ध राहील. भाविकांसाठी २० हजार चौरस फुटांचा प्रशस्त हॉल, स्वतंत्र भोजन व्यवस्था, किचन, निवारा हॉल, स्वच्छतागृहे आणि १३ खोल्यांचा भक्तनिवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात्रा कालावधीत पोलीस, आरोग्य कर्मचारी, वीज कर्मचारी, स्वयंसेवक आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळांच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. धामणगाव रस्त्यालगत विस्तीर्ण जागेत एस.टी. बस व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दुचाकी वाहनतळ, निवडूंगे रोडलगत चारचाकींसाठी स्वतंत्र जागा तसेच श्रीराम चौक व मंगल कार्यालय परिसरात अतिरिक्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बायपास रस्त्यांची दुरुस्ती करून पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.

नक्की वाचा- महिन्याभरात उद्यान विभागाच्या कामगिरीत बदल दिसला पाहिजे; ज्योती गाडे यांचा अल्टीमेटम

पिण्याच्या पाण्यासाठी नऊ ठिकाणी पाणीपोस्ट (Madhi Yatra)

निवडूंगा मार्ग येण्यासाठी, तिसगाव मार्ग बाहेर जाण्यासाठी, पाथर्डी-धामणगाव-मढी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी तर मायंबा घाट मार्ग दुचाकींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. एस.टी. स्थानक तात्पुरते धामणगाव रस्त्याकडे हलविण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नऊ ठिकाणी पाणीपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची स्टँडबाय व्यवस्था ठेवण्यात आली असून गावठाण व शेतीपंपासाठीही सुरळीत वीज मिळावी यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी डेपो, वाहतूक गाडी आणि ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. फिरती शौचालये उपलब्ध राहणार आहेत. यात्रेदरम्यान पशुहत्याबंदी व डीजे बंदीबाबत जनजागृती केली जाणार असून अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी होईल. वाढत्या गर्दीचा विचार करून ११ ते १७ मार्चदरम्यान मुक्तद्वार दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. १८ मार्च रोजी फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचा समन्वय साधला जात असून यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. भाविकांनी निर्धारित वाहनतळांचा वापर करावा, वेगमर्यादा पाळावी, मंदिर परिसरात स्वच्छता राखावी आणि अनधिकृत वसुलीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडावी, यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.अध्यक्ष विठ्ठल मरकड,उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार,माधुरी मरकड,अनिल साठे, दादासाहेब मरकड ,महादेव कोकाटे,उत्तम मरकड,अॅड. तानाजी धसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड या विश्वस्तासह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड व सर्व कर्मचारी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेत आहे.