
Governor Jishnu Dev Varma : राहुरी : विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी करावा. तसेच नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांच्या माध्यमातून शाश्वत कृषी विकास साधावा. कृषिचे पदवीधर विविध आव्हानांना सामोरे जात शाश्वत कृषी विकासाचा मार्ग दाखवतील, असा मला विश्वास आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) कुलपती जिष्णु देव वर्मा (Governor Jishnu Dev Varma) यांनी केले.
नक्की वाचा : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…
मुख्यमंत्र्यांसह यांची प्रमुख उपस्थिती
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीप्रदान समारंभात अध्यक्षस्थानावरुन स्नातकांना मार्गदर्शन करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी मंत्री प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि भाकृअप-भाकृसंसं अनुवंशशास्त्र विभागाचे मानद शास्त्रज्ञ डॉ. अशोक कुमार सिंग उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, (Governor Jishnu Dev Varma)
1969 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाने मागील पाच दशकांत कृषी विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून सुमारे 1.5 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळ घडविले आहे. विद्यापीठाने 320 उच्च उत्पादक वाण, 56 कृषी अवजारे आणि 1925 सुधारित शेती तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे. तसेच 6284 वनस्पती जनुकसंपत्तीचे जतन करण्यात आले आहे. विद्यापीठाने नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी घेतलेले दूरदर्शी पाऊल कौतुकास्पद आहे.

प्रात्यक्षिके व अनुभवाधारित युनिट्समुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळत असून शिक्षण, संशोधन आणि समाजसहभाग यांचा समन्वय साधणारी नैसर्गिक शेतीची सशक्त परिसंस्था निर्माण होत आहे. या उपक्रमांमुळे नवकल्पना, आंतरशाखीय सहकार्य आणि शेतकरी-संस्थांमधील भागीदारी बळकट होत आहे. शाश्वत उपाय शोधणे, स्थानिक ज्ञान समृद्ध करणे आणि कृषी विकासात योगदान देणे यासाठी तरुणांना प्रेरणा मिळत आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचे प्रतीक असून ते भारतीय कृषिचे भावी नेतृत्व आहेत. आधी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असे होते आता याला पंतप्रधान यांनी जय अनुसंधानाची जोड दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजून आपल्याला शेतीत आमूलाग्र बदल घडवायचे आहेत. केवळ आपत्तीत मदतीचे शेती क्षेत्र न राहता गुंतवणूकीचे क्षेत्र झाले पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांना जलसुरक्षा आणि उर्जासुरक्षा देण्यास प्राधान्य आहे. या वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत विजेचा पुरवठा करणार आहोत. सध्या शेतीसमोरील वातावरणातील बदल हे मोठे संकट आहे. जैव तंत्रज्ञानाची मदत घेवून वातावरणातील बदलाला तोंड देणारे वाण विकसीत करण्यात भर द्यावा लागेल. राज्यातील 75 टक्के शेतकरी अल्पभुधारक असून त्याला डोळ्यासमोर घेवून आपण संशोधन करु. पुढील काळात शेती मालाला भाव मिळण्यासाठी उत्पादकता वाढवावी लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल तसेच मुल्यवर्धनाची साखळी तयार करावी लागेल. याचबरोबर कृषी तंत्रज्ञानावर आधारीत विविध उद्योग सुरु करावे लागतील. शेतीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता या डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खर्चामध्ये 25 टक्क्यांपर्यत बचत होऊन उत्पादन 30%वाढते.
चारही कृषी विद्यापीठांच्या मदतीने आपण महाविस्तार ॲप तयार केले आहे. त्याला 30 लाख शेतकरी जोडले आहेत. शेतीतील अनेक समस्यांना ॲपमूळे उत्तर मिळत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी विद्यापीठ, पदवीधर यांची भूमिका महत्त्वाची आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या मदतीने कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही केवळ पदवीधर नाही तर कृषि विकासाचे दूत आहात.
राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. मुंबई येथे झालेल्या कृत्रिम बुध्दीमत्तेवर घेतलेल्या परिषदेने दाखवून दिले की शेतीला कृत्रिम बुध्दीमत्तेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की आपण कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहात. त्यामुळे आपण केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता कृषी उद्योजक बनण्याचा संकल्प करावा. कृषी क्षेत्रामध्ये अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी सेवा केंद्र, स्टार्टप्स, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती यासारख्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा उपयोग करून आपण रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनू शकता. कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, ग्रामीण विकासासाठी आणि देशाच्या अन्नसुरक्षेसाठी करावा. शेतीच्या संदर्भात विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
प्रमुख पाहुणे डॉ. अशोक कुमार सिंग म्हणाले, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांना संबाेधित करताना मान्यवरांनी सांगितले की, आज पदवी व पारितोषिके प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत स्मरणीय क्षण असून त्यांच्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा असून देशाच्या जीडीपीमध्ये 18.2 टक्के तर रोजगारामध्ये 45.6 टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. 1950-51 मध्ये 50.82 दशलक्ष टन असलेले अन्नधान्य उत्पादन 2024-25 मध्ये 357.73 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. हरितक्रांतीनंतर सुधारित वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य धोरणात्मक पाठबळामुळे उत्पादनक्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि मृदा ह्रास यांसारख्या आव्हानांमुळे कृषी क्षेत्रात वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधारित वाणनिर्मिती, जीनोम एडिटिंग, बायोफोर्टिफिकेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान व काटेकोर शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्वत शेती साध्य होऊ शकते. आपण संशोधन, शासकीय सेवा, कृषी उद्योग, ग्रामीण विकास किंवा उद्योजकता या कोणत्याही क्षेत्रात कार्य केले तरी लक्षात ठेवा-कृषी ही केवळ एक व्यवसाय नाही, तर मानवतेची सेवा आहे. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी वापरावे.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या 1925 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 320 वाणांची निर्मिती व 56 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या प्रमुख 9 पीकांच्या उदा. ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा, भात, लिंबू, बाजरी वाण आणि मोसंबी या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या 9 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकुण रु. 3,98,090 कोटी व निव्वळ 51,146 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरुप असे शेतकरीभिमुख संशोधन केलेले आहे. नवोन्मेष व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठाने स्पर्धा परिक्षा मंच, उद्योजकता विकास मंच आणि हायटेक शेती मंच स्थापन केले आहेत.
सन्माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांना कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले. यावेळी 74 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 346 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,182 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 4,602 पदव्या प्रदान केल्या. पदवीप्रदान सन 2024-25 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. निकिता गोंडल, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. वैष्णवी शिंदे, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला चि. प्रज्वल येळवंडे यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 21 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 12 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली.

अहिल्यानगरचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार श्रीमती मोनीका राजळे, माजी कुलगुरु डॉ. सुभाष पुरी, डॉ. आर.बी. देशमुख, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. व्यंकटेश मायंदे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, कृषिभुषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले.


