Gas cylinder: घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर; कोपरगाव तालुक्यातून १९ सिलिंडर हस्तगत

तहसीलदार महेश सावंत यांच्या आदेशानुसार कारवाई

0

Gas cylinder: कोपरगाव: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्याने कोपरगाव शहर व तालुक्यातील काही हॉटेल तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने (Supply Division) कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून एकूण १९ घरगुती गॅस सिलिंडर हस्तगत करण्यात आले आहेत. 

अवश्य वाचा- धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

तहसीलदार महेश सावंत यांच्या आदेशानुसार कारवाई (Gas cylinder)

तहसीलदार महेश सावंत यांच्या आदेशानुसार तालुका पुरवठा अधिकारी अमोल फोपसे यांच्या नेतृत्वाखाली, पुरवठा निरीक्षक अदिती भालेराव, पुरवठा सहाय्यक गणेश गरुड आणि पुरवठा सहाय्यक रजनी पावरा यांच्या पथकाने शहरातील विविध भागांत अचानक तपासणी मोहीम राबविली. या तपासणीदरम्यान अनेक हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करत पुरवठा विभागाने शहरातील विविध ठिकाणांहून एकूण १९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणे तसेच त्याचा काळाबाजार करणे हा नियमबाह्य प्रकार असल्याने अशा प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार महेश सावंत यांनी दिला आहे तसेच घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाही फक्त नागरिकांनी भीतीपोटी साठा करून ठेवू नये, असे आवाहन देखील तहसीलदार सावंत यांनी केले.