नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Stormy Rain : नगर : भारतीय हवामान खात्याच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस (Stormy Rain) व विजांच्या कडकडाटाची (Thunder and Lightning) शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १८ व १९ मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (District Disaster Management Authority) मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
वीज कोसळण्याची शक्यता
वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब व लोखंडी कुंपणाजवळ उभे राहू नये. वीज कोसळण्याची शक्यता असल्याने या काळात विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा व ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे यांसारख्या सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे. घराबाहेर मोकळ्या जागेत अडकल्यास गुडघ्यांवर बसून कान व डोके झाकून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळावे (Stormy Rain)
जाहिरात फलक कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याजवळ थांबणे टाळावे. धरणे, नद्या व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये व धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळावे. शेतकऱ्यांनी वादळी वारा व पावसापासून शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, तसेच काढणीस आलेला शेतमाल व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर व ०२४१ – २३२३८४४ या दूरध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गिते यांनी केले आहे.



