Acid attack: संगमनेर हादरले! सहावीतील चिमुरडीवर अ‍ॅसिड हल्ला; आरोपी पसार, उद्या रास्ता रोको

अज्ञात विकृताने चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड

0

Acid attack: संगमनेर: तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील वडगाव पान येथे एका अज्ञात नराधमाने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अवघ्या १३ वर्षीय चिमुरडीवर अ‍ॅसिड फेकून (Acid attack) तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. या भीषण हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी (seriously injured) झाली असून, आरोपी दुचाकीवरून पसार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

अवश्य वाचा- अहिल्यानगर महापालिकेत स्थायी समितीकडून तब्बल १७१० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर

अज्ञात विकृताने चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड (Acid attack)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (ता.१७) सकाळी ११:४० वाजेच्या सुमारास वडगाव पानमधील महादेवमळा रस्त्यावर घडली. पीडित विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे पायी निघाली होती. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात विकृताने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले आणि क्षणात तेथून पळ काढला. अ‍ॅसिडच्या दाहकतेने चिमुरडीचा चेहरा भाजल्याने ती वेदनेने विव्हळत जवळच्याच एका घरात धावत गेली. तेथील महिलांनी प्रसंगावधान राखत तिला तातडीने आधार दिला आणि उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. अ‍ॅसिडमुळे मुलीचा उजव्या बाजूचा चेहरा पूर्णतः भाजला आहे. तिला तातडीने लोणी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

नक्की वाचा-  ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

ग्रामस्थांचा संताप आणि उद्या ‘रास्ता रोको’ (Acid attack)

या निर्घृण घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वडगाव पानमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता.१८) सकाळी तळेगाव फाटा येथे  ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.